कोरोनाच्या विळख्यात अडकलेल्या 'या' देशाने खुली केली धार्मिक स्थळे

कोरोनाच्या विळख्यात अडकलेल्या 'या' देशाने खुली केली धार्मिक स्थळे

नवी दिल्ली - इराण या देशात धार्मिक स्थळे पुन्हा खुली करण्यात आली आहेत. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर फेब्रुवारी महिन्यामध्ये देशातील शाळा, विद्यालये, मोठी आस्थापने आणि धार्मिक स्थळे बंद करण्याचा निर्णय इराणमध्ये घेण्यात आला होता. चीन मधून सर्व जगभर पसरलेल्या या विषाणूमुळे सगळीकडेच भीतीचे वातावरण असून, पुन्हा विखुरलेली परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी सगळेच देश प्रयत्न करत आहेत. मात्र अद्याप पर्यंत दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड  जर्मनी व काही प्रमाणात जपान हे ठराविक देश सोडल्यास कोणालाच परिस्थिती नियंत्रणात आणता आलेले नाही.

जगभरात वेगाने संक्रमण करणाऱ्या कोरोना विषाणूला थोपविण्यासाठी अनेक देशांनी आपत्कालीन परिस्थिती म्हणून राष्ट्रीय आणीबाणी जाहीर होती. यानंतर कोरोनाच्या विषाणूवर कोणताच परिणामकारक इलाज न मिळाल्याने बहुतेककरून सगळ्याच देशांनी लॉकडाउन निर्णय घेतल्याचे पाहायला मिळाले. जानेवारीच्या अखेरीस चीन आणि दक्षिण कोरियानंतर कोरोनाचे सर्वात अधिक रुग्ण इराणमध्ये आढळल्यानंतर इराणच्या सरकारने संपूर्ण देशात लॉकडाउनचा निर्णय घेतला होता. यामध्ये शाळा, विद्यालयांपासून धार्मिक स्थळे बंद करण्यात आली. त्यानंतर तब्बल अडीच महिन्यांनी धार्मिक स्थळे पुन्हा खुली करण्याचा निर्णय इराण मध्ये घेण्यात आला असून, सोमवारी तेहरान मधील शाह अब्दोल-अजीम दरगाह खुले करण्यात आले. यावेळी खबरदारी म्हणून तोंडाला मॉस्‍क घातलेल्या नागरिकांनाच प्रवेश देण्यात आला. इराणमध्ये कोरोनाच्या विषाणूचा वेग उतरणीला लागल्याने हा निर्णय घेण्यात आला असल्याचे यावेळी इराणकडून सांगण्यात आले.

दरम्यान, कोरोनाचा जबर फटका सर्वच देशांना बसला असून, सर्वच देशातील जनजीवन मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाले आहे. यामुळे अर्थव्यवस्थेची हालत देखील नाजूक झाल्याचे चित्र समोर आहे. त्यामुळे देशातील जनजीवन पुन्हा रुळावर आणून थंडावलेल्या अर्थव्यवस्थेला पुन्हा चालना मिळावी यासाठी सर्व देश युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत. त्यामुळे इराणने देखील खबरदारीचा उपाय म्हणून सोशल डिस्टंसिंग पाळण्याचे कडक निर्देश देत, धार्मिक स्थळे पुन्हा खुली करण्याचा निर्णय घेतला आहे. संपूर्ण इराण मध्ये आतापर्यंत १ लाख ३७ हजार ७२४ नागरिक कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर ७ हजार ४५१ नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com