भारत नाही, चीन नाही' 'या' देशात कोरोनावर लस सापडल्याचा दावा

टीम ई-सकाळ
Thursday, 12 March 2020

यापूर्वी ऑस्ट्रेलियातील एका लॅबमध्ये कोरोनावर लस सापडल्याचा दावा केला जात होता. त्या संशोधनात भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञाचे योगदान असल्याचे सांगितले जात होते.

जेरूसलेम Coronavirus : कोरोनाच्या विषाणूंवर लस शोधण्यामध्ये इस्रायलच्या संशोधकांना यश आल्याची माहिती तेथील स्थानिक माध्यमांनी दिली आहे. इस्राईल सरकारकडून लवकरच याबाबत घोषणा केली जाऊ शकते. यापूर्वी ऑस्ट्रेलियातील एका लॅबमध्ये कोरोनावर लस सापडल्याचा दावा केला जात होता. त्या संशोधनात भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञाचे योगदान असल्याचे सांगितले जात होते. पण, आता इस्रायलमधून लस सापडल्याचा दावा केला जात आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

इस्राईलमधील आघाडीचे दैनिक हाएरेत्झने वैद्यकीय संशोधकांच्या हवाल्याने प्रसिद्ध केलेल्या वृत्तामध्ये म्हटले आहे की, याच देशातील आघाडीची जैव संशोधन संस्था पंतप्रधानांच्या कार्यालयाच्या देखरेखीखाली या संदर्भात संशोधन करत होती. या संस्थेमधील शास्त्रज्ञांना या विषाणूची जैविक संरचना आणि त्याची वैशिष्ट्ये समजून घेण्यात यश आले आहे. यामुळे या विषाणूचे योग्य पद्धतीने निदान होण्यास मदतच होणार असून त्याचा सामना करणाऱ्या अँटीबॉडीजची निर्मिती करणेही शक्य होईल. दरम्यान, या विषाणूवर लस तयार करण्यात आल्यानंतर तिचा प्रत्यक्ष वापर होण्यास देखील बराच वेळ लागेल, कारण या लशीच्या प्रभावाबाबत आधी बऱ्याच चाचण्या घेऊन तिची परिणामकारकता तपासावी लागेल.

आणखी वाचा - पुणेकरांनो, तुम्ही परदेशात कुठं कुठं फिरलाय

इस्त्रायलचे संरक्षण मंत्रालय काय सांगते?
दरम्यान इस्रायलच्या संरक्षण मंत्रालयाने मात्र हे वृत्त फेटाळून लावले आहे. या संस्थेमध्ये सध्या लसीबाबत संशोधन सुरू आहे हे खरे असले तरीसुद्धा लस शोधण्यात मात्र आम्हाला यश आलेले नाही, असे मंत्रालयाकडून सांगण्यात आले. कोरोनाची लस तयार करण्यासाठी सध्या जगभर संशोधन सुरू आहे. या विषाणूंचा प्राण्यांवर नेमका काय परिणाम होतो हे देखील तपासले जात आहे. चीनने जानेवारीमध्येच या विषाणूची जनुकीय संरचना प्रसिद्ध केली होते. यामुळे सरकारी आणि खासगी संस्था यांना लस तयार करणे अधिक सोपे होईल.

आणखी वाचा - जगात कोरोनाविषयी कुठं काय घडलं?

चीनमध्ये प्रभाव कमी होतोय 
कोरोना विषाणूंच्या प्रसाराचा केंद्रबिंदू असलेल्या चीनमधील वुहान प्रांतात या विषाणूंचा प्रभाव हळूहळू कमी होताना दिसतो आहे. आज प्रथमच येथील कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये एक अंकी वाढ नोंदविली गेली. नव्याने केवळ आठजणांनाच या विषाणूचा संसर्ग झाल्याचे उघड झाले आहे, चीनमध्ये या विषाणूचा संसर्ग झाल्याने मरण पावलेल्यांची संख्या मात्र ३ हजार १६९ वर पोचली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: israel lab claim for coronavirus vaccine information marathi