धक्कादायक! व्हॉट्‌सऍपद्वारे भारतीयांवर ठेवली जातेय पाळत

Israeli-Spyware-Whatsapp
Israeli-Spyware-Whatsapp

न्यूयॉर्क : भारतातील नामांकित पत्रकार आणि मानवाधिकार कार्यकर्ते यांच्यावर पाळत ठेवण्यासाठी व्हॉट्‌सऍपच्या माध्यमातून इस्रायली स्पायवेअरचा हल्ला करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर केंद्र सरकारने व्हॉट्‌सऍपलाचा नोटीस बजावत 4 नोव्हेंबरपर्यंत उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत. 

व्हॉट्‌सऍप या संदर्भात इस्रायली हेरगिरी करणारी कंपनी 'एनएसओ' ग्रुपविरोधात खटला भरण्याच्या तयारीत असून या फर्मनेच हे तंत्रज्ञान विकसित केले आहे. या स्पायवेअरच्या माध्यमातून चौदाशे युजर्संवर पाळत ठेवण्यात आल्याचे उघड झाले आहे. 'पेगासस' या स्पायवेअर माध्यमातून ही हेरगिरी करण्यात आली. जगभरातील वीस देशांमधील चौदाशेपेक्षाही अधिक लोकांना या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून लक्ष्य करण्यात आले.

दरम्यान, भारतामध्ये नेमक्‍या कितीजणांना या हेरगिरीचा फटका बसला ते मात्र व्हॉट्‌सऍपने जाहीर केलेले नाही. देशातील नामांकित पत्रकार, शिक्षणतज्ज्ञ, दलित आणि मानवाधिकार कायकर्ते यांच्या व्हॉट्‌सऍप मेसेजवर या माध्यमातून नजर ठेवण्यात आली होती. ज्यांना या हेरगिरीचा फटका बसला आहे अशांना व्हॉट्‌सऍपवरून विशेष मेसेज करून सावध करण्यात आले आहे. 

या हॅकिंगचा फटका बसलेल्यांचे फोन मे महिन्याच्या अखेरपर्यंत साधारणपणे दोन आठवड्यांच्या कालावधीसाठी देखरेखीखाली होते असे फेसबुकने प्रसिद्ध केलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे. आफ्रिका, युरोप, मध्यपूर्व आणि उत्तर अमेरिका खंडातील पत्रकार आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांवर या स्पायवेअरच्या माध्यमातून पाळत ठेवण्यात आली.

अमेरिकेत पडसाद 

या हल्ल्याविरोधात अमेरिकेतील काही मानवाधिकार कार्यकर्त्यांनी तेथील न्यायालयामध्ये धाव घेतली असून या स्पायवेअरची जनक म्हणून ओळखल्या जाणारी एनएसओ ग्रुप आणि क्‍यु सायबर टेक्‍नोलॉजी या कंपन्यांविरोधात आता खटले भरले जाऊ शकतात. या स्पायवेअर हल्ल्याची तपासणी करण्यासाठी व्हॉट्‌सऍपसोबत काम करणाऱ्या सिटीजन लॅबने म्हटले आहे की, हे स्पायवेअर इस्राईलमधील एका कंपनीने तयार करून त्याची विक्री केली आहे. युरोपातील प्रायव्हेट इक्विटी फर्म 'नोव्हालपिना कॅपिटल' ही कंपनी याची मुख्य मालक आहे. 

यूजर्संचे फोन लक्ष्य 

ही कंपनी स्पायवेअरची विक्री केवळ सरकारलाच करत असते. हा सगळा खरेदी आणि विक्री व्यवहार हा इस्राईली कायद्याच्या चौकटीत होत असतो. मागील काही वर्षांमध्ये या स्पायवेअरच्या माध्यमातून मानवाधिकार कार्यकर्त्यांना लक्ष्य करण्याचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढले असल्याचे या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे. पेगासूस अथवा क्‍यू सूट हे स्पायवेअर विविध मार्गांनी युजर्संच्या फोनमध्ये प्रवेश करतात. या माध्यमातून युजर्संचा फोन देखील हॅक करता येतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com