Coronavirus - रात्र वैऱ्याची आहे; युरोपला ठेच, भारत शहाणा?

जीवन करपे, जर्मनी 
Friday, 30 October 2020

युरोपीय देश किंवा अमेरिकेच्या तुलनेत त्याचे भारतात थैमान कमी राहिले, मृत्यूही आटोक्‍यातच राहिले. याचे कारण सरकारसह जनतेने प्रतिबंधात्मक उपायांची केलेली काटेकोर अंमलबजावणी. 

कोरोनाच्या लाटेला साऱ्या जगाने तोंड दिले. लॉकडाऊन सगळीकडेच जवळजवळ होता. तथापि, युरोपीय देश किंवा अमेरिकेच्या तुलनेत त्याचे भारतात थैमान कमी राहिले, मृत्यूही आटोक्‍यातच राहिले. याचे कारण सरकारसह जनतेने प्रतिबंधात्मक उपायांची केलेली काटेकोर अंमलबजावणी. आता युरोप दुसऱ्या लाटेला तोंड देत आहे... 

पुन्हा एकदा फोन येऊ लागलेत... दादा, मी थोडासा पॅनिक आहे. डॉक्‍टरांची अपॉइंटमेंट मिळत नाही. कोविड हॉटलाईनला कोणी उत्तर देत नाही वगैरे वगैरे. जबरदस्त आवेशात दुसरी लाट आली आहे... कसले आलंय स्वातंत्र्य. स्वातंत्र्यात अराजकता नसावी... अगदी नको ते घडले आहे. आज पुन्हा एकदा लॉकडाऊन जाहीर झाले. नोव्हेंबरपासून जर्मनीमध्ये पुन्हा सगळे बंद! 

हे वाचा - इंटरनेटच्या मायाजालात गुरफटले जग

नडलाय ओव्हरकॉन्फिडन्स... 
आता भारतामध्ये कोविडची वाटचाल पराभवाच्या दिशेने चालू आहे. जसे महाराजांनी गनिमीकावा, जो जगभरात कोणाला अवगत नव्हता, त्याचप्रमाणे जर का कोविडचा नायनाट करायचा असेल तर फक्त आणि फक्त मास्क आणि स्वच्छताच! याच "गनिमीकाव्या'चा वापर वारंवार करत राहावा, प्लिज. युरोपातल्या गोऱ्या सायबाला पुन्हा एकदा ओव्हरकॉन्फिडन्स नडलाय. 

हे वाचा - पाकच्या संसदेत मोदी नामाचा घोष

साधारण जुलैमध्ये वाटत होते की, कोविडचा कार्यक्रम लवकरच आटोपेल... पण तसे काही न होता, कोविडने उसंत न घेता हळुवारपणे स्वतःचा हल्ला सुरुच ठेवलाय.जी चिंता सर्वांना लागून राहिली होती की, हा पृथ्वीवर आलेला विषाणू जर का ऑक्‍टोबरपर्यंत राहिला तर युरोप आणि बाकी थंड प्रदेशामध्ये पुन्हा एकदा थैमान घालेल. आणि हो! तसेच काहीसे होताना दिसते आहे. कारण आता युरोप आणि थंड प्रदेशामध्ये थंडी सुरु होते आहे... स्वेटर, कानटोपी, जाकीटशिवाय बाहेर पडणे मुश्‍किल होते आहे. 

भारत शहाणा?
- मास्कच्या वापराची सक्ती 
- स्वच्छतेचा आग्रह पथ्यावर 
- पोलिसांचा परिणामकारक बंदोबस्त 
- खरा देव डॉक्टरांच्या रुपात असल्याची भावना
-निर्बंध पालनाबाबत बहुतांशी जागरुकता

 युरोपला ठेच...  
- रस्त्यावर, गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर नाही 
- ट्रेन, बस, सुपरमार्केटमध्ये मास्क नसल्याने दंडाची कारवाई. 
- युरोपात थंडीला सुरवात, दुसऱ्या लाटेची भीती 
- स्वेटर, कानटोपी, जाकीट वापरणे अपरिहार्य 

मास्कची सक्ती, स्वच्छतेचे संदेश 
खरे तर जे भारताने केले तसे जवळपास कुठल्याच देशाने किंवा खंडाने केलेले आढळलेले नाही. सतत वर्तमानपत्रे, टीव्ही, समाज माध्यमांवर मास्कची सक्ती आणि स्वच्छतेचे संदेश भारतात दिले गेले. या संदेशांमधून लोकांमध्ये आलेली जागरूकता. पोलिसांचा कडेकोट आणि परिणामकारक बंदोबस्त. या सर्व बाबी इतर देशांमध्ये तुलनेनं कुठेच दिसल्या नाहीत. त्या उलट प्रगत देशांमध्ये मास्क वापरालाही जास्त विरोध झाला. संचारबंदीसारख्या उपायांच्या विरोधात लोक रस्त्यावर येत होते. विरोध कसा करायचा, याचाच विचार जास्त झाला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

देर आये दुरुस्त आये... 
मी आता, म्हणजे कोविडच्या काळामध्ये ऑस्ट्रिया, इटली, स्लोवाकिया, हंगेरी या सर्व देशांमध्ये प्रवास केला. त्यानंतर प्रकर्षाने जाणवले की रस्त्यावर किंवा गर्दीच्या ठिकाणी लोक मास्कचा वापर करताना दिसत नव्हते. ट्रेन, बस, सुपरमार्केटमध्ये मास्कचा वापर न केल्यास हजारो रुपयांचा दंड होत होता. पण... रस्त्यावर चालताना मास्कचा वापर सक्तीचा नव्हता. आता काही मोठ्या शहरांमध्ये रस्त्यावर चालतानादेखील मास्कचा वापर सक्तीचा केलाय. देर आये दुरुस्त आये... म्हणून म्हणतोय धन्य झालो की, महाराजांच्या भूमीत जन्मलो. जर का कोविडचा नायनाट करायचा असेल तर फक्त आणि फक्त मास्क आणि स्वच्छता या "गनिमीकाव्या'चा वापर वारंवार करत राहा, प्लिज. पुन्हा एकदा माझ्या सर्व माता, भगिनी, बांधवांना आवाहन करतो की रात्र वैऱ्याची आहे. कोविडची दुसरी लाट न परवडणारी आहे... सरकारने घालून दिलेल्या नियमांचे पालन करा आणि सुरक्षित राहा! खरा देव मंदिरात नसून दवाखान्यात आणि तुमच्या चांगल्या कर्मातच आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jeevan karpe writes about second wave of corona has hit Germany