जॉन्सन अँड जॉन्सनच्या लसीची आता मानवी चाचणी; एकाच डोसमध्ये येतोय रिझल्ट

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 30 July 2020

जगभरात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढला असून त्यावर वॅक्सिन शोधण्यासाठी अनेक देशांमध्ये प्रयत्न सुरू आहेत. आता जॉनसन अँड जॉनसन कंपनीने वॅक्सिनच्या संशोधनात एक पाऊल पुढं टाकलं आहे.

नवी दिल्ली - जगभरात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढला असून त्यावर वॅक्सिन शोधण्यासाठी अनेक देशांमध्ये प्रयत्न सुरू आहेत. आता जॉनसन अँड जॉनसन कंपनीने वॅक्सिनच्या संशोधनात एक पाऊल पुढं टाकलं आहे. कंपनीने केलेल्या एका कोरोना व्हायरसच्या वॅक्सिनची माकडांवर चाचणी घेण्यात आली होती. त्या माकडांना कोरोनाच्या संसर्गापासून वाचवण्यात येश आलं आहे. एका अभ्यासातून याचा खुलासा कऱण्यात आला आहे. जॉनसन अँड जॉनसनच्या एकाच डोसने माकडांना धोकादायक अशा व्हायरसपासून वाचवलं आहे. एका आठवड्याच्या आतच याचे सकारात्मक असे परिणाम समोर आलेलं हे दुसरं कोरोना वॅक्सिन आहे. 

जर्नल नेचरमध्ये याबाबतची माहिती प्रकाशित करण्यात आली आहे. यानुसार वॅक्सिनचा डोस दिलेल्या सहा पैकी सहा प्राणी व्हायरसच्या संपर्कात आल्यानंतरही फुफ्फुसाच्या आजारापासून सुरक्षित होते. तर सहापैकी पाच जणांना कोरोनाची लागण झाली नाही. सर्व प्राण्यांच्या नाकातून घेण्यात आलेल्या स्वॅबची तपासणी केली होती. 

हे वाचा - भारत-चीन सीमेवर पुन्हा तणाव; भारतानं सुरू केली तयारी

जॉनसन अँड जॉनसनचे मुख्य वैज्ञानिक अधिकारी डॉक्टर पॉल स्टॉफल्स यांनी सांगितलं की, आम्हाला यातून विश्वास मिळाला की कोरोनाच्या या साथीमध्ये वॅक्सिनची चाचणी करू शकतो आणि मानवासाठी किती प्रभावी आणि सुरक्षित आहे हे पाहू शकतो. 

कंपनीने नुकतंच युरोप आणि अमेरिकेतील लोकांवर या वॅक्सिनची चाचणी सुरु केली आहे. एक हजारांहून अधिक निरोगी वयोवृद्ध लोकांवर केली जाणारी चाचणी सध्या पहिल्या टप्प्यात आहे. यामध्ये 18 ते 55 वर्षे आणि 65 वर्षांवरील लोकांचा समावेश आहे.

हे वाचा - चीन लडाखमध्ये मोठ्या संघर्षाची करतोय तयारी; सॅटेलाईट फोटोंमधून उघड

जगभरात 30 हून अधिक वॅक्सिनची मानवी चाचणी केली जात आहे. यापैकीच जॉनसन अँड जॉनसन ही एक कंपनी आहे. मानवी चाचणीसाठी किती वेळ लागेल याची माहिती कंपनीकडून देण्यात आलेली नाही. जॉनसन अँड जॉनसने केलेल्या चाचणीमध्ये असं दिसून आलं आहे की, Ad26 Vaccine मुळे माकडांच्या शरीरात अँटीबॉडिज तयार झाल्या आणि कोरोनापासून त्यांचं संरक्षणही झालं. 

जगभरात कोरोनाचे एकूण  कोटी 72 लाखांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. तर मृतांचा आकडा 6 लाख 71 हजारांच्यावर पोहोचला आहे. तर 1 कोटी कोरोनाबाधित ठणठणित बरे होऊन घरी गेले आहेत. अमेरिका, ब्राझील आणि भारतात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: johnson and johnson start human trial for covid 19 vaccine