
शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ ट्विट केल्यानंतर मीना हॅरिस यांचा काहींनी विरोध केला होता. त्यांचे पोस्टर्ससुद्धा काही ठिकाणी जाळण्यात आले होते. यावर मीना हॅऱिस यांनी संताप व्यक्त केला होता.
वॉशिंग्टन - देशात सुरु असलेल्या कृषी कायद्याविरोधातील आंदोलनावर आता आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चा केली जात आहे. अमेरिकेची पॉप सिंगर रिहानाने केलेल्या ट्विटनंतर जगभरातील अनेक सेलिब्रिटींनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. आता अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांच्या भाचीनेसुद्धा आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. याआधीही त्यांनी याबाबत ट्विट केले होते. त्यांनी म्हटलं होतं की, जगातील सर्वात मोठी लोकशाही धोक्यात आली. आता पुन्हा एकदा गुरुवारी मीना हॅरिस यांनी ट्विटरवरून शेतकरी आंदोलनावर ट्विट केलं आहे.
मीना हॅरिस यांनी म्हटलं की, भारतीय शेतकऱ्यांच्या मानवाधिकारांचं समर्थन मी करत आहे. बघा कशा प्रतिक्रिया मिळत आहेत. तसंच मी घाबरणार नाही आणि गप्पसुद्धा बसणार नाही. शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ ट्विट केल्यानंतर मीना हॅरिस यांचा काहींनी विरोध केला होता. त्यांचे पोस्टर्ससुद्धा काही ठिकाणी जाळण्यात आले होते. यावर मीना हॅऱिस यांनी संताप व्यक्त केला होता. भारताच्या अंतर्गत प्रश्नामध्ये नाक खुपसू नका असं बोलणाऱ्यांना त्यांनी सुनावलं होतं. त्या म्हणाल्या होत्या की, तुमच्या मुद्द्यांपासून मला दूर राहण्यास सांगू नका, हे सर्व आमचेही मुद्दे आहेत.
Weird to see a photo of yourself burned by an extremist mob but imagine what they would do if we lived in India. I'll tell you—23 yo labor rights activist Nodeep Kaur was arrested, tortured & sexually assaulted in police custody. She's been detained without bail for over 20 days. pic.twitter.com/Ypt2h1hWJz
— Meena Harris (@meenaharris) February 5, 2021
स्वत:चा फोटो कट्टरपंथीयांकडून जाळला जाणं हे बघायला विचित्र वाटतं. विचार करा जर आम्ही भारतात असतो तर यांनी काय केलं असतं? आंदोलनातील 23 वर्षीय नवदीप कौरला अटक केली. त्याच्यावर पोलिस कोठडीत अत्याचार झाले. जामिन न देता गेल्या 20 दिवसांपासून तुरुंगात ठेवलं आहे असं म्हणत मीना हॅरिस यांनी ट्विट केलं होतं. त्यासोबतच फक्त कृषी धोरणाबद्दल नाही. तर अल्पसंख्यांकाच्या छळाबद्दलही आहे. ही जागतिक हुकुमशाही आहे आणि म्हणूनच तुम्ही मला तुमच्या मुद्द्यांपासून दूर रहायला सांगू नका असं त्यांनी म्हटलं होतं.
मीना हॅरिस या व्यवसायाने वकील आहेत. याआधी त्यांनी भारतातल्या शेतकरी आंदोलनाचा एक फोटो ट्विट केला होता. त्यात म्हटलं होतं की, जगातील सर्वात जुन्या लोकशाहीवर एक महिन्याआधी हल्ला झाला आणि सर्वात मोठ्या लोकशाहीला धोका निर्माण झाला आहे. या दोन्ही घटना एकमेकांशी संबंधित आहेत. भारतात शेतकरी आंदोलनात सुरक्षा दलांकडून होणारी दडपशाही आणि इंटरनेट बंद करण्याविरोधात आवाज उठवला पाहिजे.