US President Election : जाणून घ्या कोण आहेत कमला हॅरिस?

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 8 November 2020

आईच्या हातचा दहीभात, डाळ, इडली खाऊन मोठं झाल्याचं त्या अभिमानाने सांगतात.

अमेरिकेच्या चुरशीच्या निवडणुकीचा निकाल लागला आहे. डेमोक्रॅटीक पक्षाच्या ज्यो बायडेन यांनी या निवडणुकीत बाजी मारली आहे. 290 इलेक्टोरल व्होट्सनी जो बायडेन यांनी बाजी मारली आहे तर डोनाल्ड ट्रम्प यांना केवळ 214 च इलेक्टोरल व्होट्स प्राप्त झाले आहेत. सोबतच अमेरिकेच्या पहिल्या महिला उपराष्ट्राध्यक्षा म्हणून भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांची इतिहासात नोंद झाली आहे. पण कोण आहेत कमला हॅरिस? कशी राहिलीय त्यांची आजवरची राजकीय कारकिर्द? हेच आपण जाणून घेणार आहोत. 

कोण आहेत कमला हॅरिस?
कमला या अमेरिकेच्या इतिहासातील पहिल्या उपराष्ट्राध्यक्ष ठरल्या आहेत. शिवाय त्या भारतीय वंशाच्या आणि दक्षिण आशियाई वंशाच्या पहिल्या उपराष्ट्राध्यक्ष ठरल्या आहेत. 55 वर्षांच्या कमला हॅरिस यांचा जन्म कॅलिफोर्नियामधील ओकलंडचा आहे. त्यांचे आईवडील दोघेही स्थलांतरित होऊन अमेरिकेत आलेले आहेत. आईचा शामला यांचा जन्म भारतातला आहे आणि वडिलांचा अफ्रिकेतील जमैकातला. श्यामला या कॅन्सर संशोधक आणि नागरी हक्क कार्यकर्त्या होत्या. तर कमला यांचे वडील अर्थतज्ज्ञ आहेत. त्यांचे आईवडील विभक्त झाल्याने नंतर कमला आणि त्यांची बहिण माया यांचा सांभाळ त्यांच्या आईनेच केला. 

हेही वाचा - US President Election : जाणून घ्या कोण आहेत जो बायडेन?

भारताशी असलेलं नातं
कमला यांचा कायमच त्यांच्या भारतीय मुळाशी संपर्क आला आहे. आईसोबत त्या भारतातही येत असत. आईच्या हातचा दहीभात, डाळ, इडली खाऊन मोठं झाल्याचं त्या अभिमानाने सांगतात. अमेरिकेतल्या भारतीयांना कमला या त्यांच्यापैकीच एक यासाठी वाटतात. 2014मध्ये कमला हॅरिस यांनी डग्लस एमहॉफ यांच्याशी लग्न केलं. 

हेही वाचा - 'We Did It Joe', बायडेन यांना कमला हॅरिस यांचा कॉल; शेअर केला VIDEO

शैक्षणिक आणि राजकीय कारकिर्द 
अमेरिकेतल्या हार्वर्ड विद्यापीठात कमला यांनी 4 वर्षं शिक्षण घेतलं आहे. हार्वडमधल्या शिक्षणानंतर कमला हॅरिस यांनी युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियामधून कायद्याची पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी अल्मेडा काऊंटीच्या डिस्ट्रीक्ट ऍटर्नी कार्यालयापासून करिअरला सुरुवात केली. 2003साली त्या सॅन फ्रान्सिस्कोच्या डिस्ट्रिक्ट ऍटर्नी झाल्या. 2017 साली त्यांची निवड कॅलिफोर्नियाच्या ज्युनियर युएस सिनेटर म्हणून झाली. कमला हॅरिस यांनी गेल्या वर्षीच्या सुरुवातीला अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदासाठीच्या उमेदवाराच्या शर्यतीत आपण असल्याचंही जाहीर केलं होतं. ब्लॅक लाईव्हज मॅटरच्या चळवळीत देखील कमला यांनी महत्वाची भुमिका पार पाडली होती.  यंत्रणांमध्ये असणारा वर्णभेद मोडून काढायला हवा, असं त्यांनी अनेकदा मांडलं आहे. अमेरिकेतल्या वंचितांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण योग्य असल्याचं त्यांनी अनेकदा म्हटलं आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Know who is kamala harris in marathi all about us vice president kamala harris