US Election : अमेरिकेचा हाय व्होल्टेज ड्रामा कधी संपणार?

सकाळ वृत्तसेवा
Friday, 6 November 2020

डोनाल्ड ट्रम्प आणि जो बायडेन या दोन्हीही उमेदवारांनी आपापल्या विजयाबाबत छोतीठोकपणे दावा केलाय. मात्र, या निवडणुकीच्या निकालाला इतका उशीर का होतोय? 

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या निवडणुकीचा हाय व्होल्टेज ड्रामा काही संपायचं नाव घेत नाहीये. डोनाल्ड ट्रम्प आणि जो बायडेन या दोन्हीही उमेदवारांनी आपापल्या विजयाबाबत छोतीठोकपणे दावा केलाय. मात्र, या निवडणुकीच्या निकालाला इतका उशीर का होतोय? आणि नेमका निकाल लागणार तरी कधी? हे प्रश्न तुम्हालाही पडले असतील ना? रिपब्लिक पक्षाच्या डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर डेमोक्रॅटीक पक्षाच्या जो बायडेन यांनी तगडे आव्हान उभं केलं होतं. निवडणुकीच्या पूर्वी दिलेल्या सगळ्या अंदाजांमध्येही जो बायडेन यांचीच आघाडी दिसून येत होती. होतंय देखील तसंच. सध्या जो बायडेन हे ट्रम्प यांच्यापेक्षा निश्चितच आघाडीवर आहेत. अगदी आकडेवारीसहीत बोलायचं झालं तर जो बायडेन हे 264  इलेक्टोरल व्होट्सनी आघाडीवर आहेत तर डोनाल्ड ट्रम्प यांनी 214 इलेक्टोरल व्होट्स प्राप्त केले आहेत. जिंकण्यासाठीचा जादुई आकडा आहे तो 270 इलेक्टोरल व्होट्सचा... मग घोडं नेमकं अडलंय तरी कुठं...?

दोन्हीही प्रतिस्पर्ध्यांनी आपणच जिंकणार, असा छातीठोकपणे दावा केला आहे. मात्र, अद्याप इतका उशीर का होतोय? याचं एक महत्वाचं कारण आहे ते कोरोना... कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या नागरिकांनी पोस्टल मतदानाला अधिक प्राधान्य दिलं आहे. त्यामुळे मतमोजणी करताना विलंब होतो आहे. दुसरी गोष्ट अशी की, भारतात जसं निवडणूक आयोग नावाची स्वतंत्र अशी स्वायत्त संस्था आहे, तशा प्रकारची व्यवस्था अमेरिकेमध्ये नाहीये. म्हणजे देशव्यापी असा निवडणूक आयोग अमेरिकेत ही प्रक्रिया राबवत नाही. तर अमेरिकेच्या प्रत्येक राज्यात स्वतंत्रपणे मतदानाची प्रक्रिया होते. तसेच हे मतदान कसं मोजावं याबाबत देखील अमेरिकेतील वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळे कायदे आहेत. तिथं होणाऱ्या निवडणुकीवर देखरेख त्या-त्या राज्यातील प्रशासनाकडून केलं जातं. त्यामुळे वेगवेगळ्या राज्यांतील नियम आणि कायदे वेगळे आहेत. याचा निकालावर परिणाम होत आहे. त्यामुळेच या प्रक्रियेला थोडा विलंब लागण्याची शक्यता आहे.

हेही वाचा - जॉर्जिया-मिशीगनची कायदेशीर लढाईही ट्रम्प हारले; कल बायडेन यांच्याच बाजूने
अमेरिकेत इलेक्टोरल कॉलेज पद्धतीने मतमोजणी केली जाते. म्हणजे काय? तर राज्याच्या लोकसंख्येनुसार त्या त्या ठिकाणी विशिष्ट संख्येने इलेक्टर्स असतात. तुम्ही या राज्यांत बहुमत मिळवल्यास त्या राज्यातील संपूर्ण इलेक्टर्स तुमच्या बाजूने जातात. पण काही राज्यांत वेगळी यंत्रणादेखील अस्तित्वात आहे. या निवडणूकीत अर्थातच डेमोक्रॅटीक जो बायडेन हे आघाडीवर आहेत, मात्र त्यांना विजयासाठी आवश्यक असणारी मते अद्याप मिळालेली नाहीयेत. मात्र, ते विजयाच्या जवळ आहेत, हे निश्चित आहे. ट्रम्प यांना जर निवडणूक जिंकायची असेल तर त्यांना जॉर्जिया, पेन्सिल्व्हेनियासह , नॉर्थ कॅरोलिना, नेवाडा आणि अरिझोना या राज्यांत जिंकावं लागेल. बायडेन यांनी जर नेवाडा, अरिझोना आणि विल्किन्सन तसंच मिशिगन राज्यांत विजय मिळवला तर त्यांना 270 मतं मिळतील आणि ते आकड्यांच्या आधारावर विजयी ठरतील.

हेही वाचा - US Election : थेट अंतराळातून दिलं मत; जाणून घ्या कशी होते ही प्रक्रिया

पण अडचणी इथेच संपणार नाहीयेत. याचं कारण आहे, डोनाल्ड ट्रम्प यांनी सर्वोच्च न्यायालयात घेतलेली धाव... डोनाल्ड ट्रंप यांनी या निवडणूक प्रक्रियेवर आक्षेप नोंदवले आहेत. निवडणूक प्रक्रियेत घोटाळा झाल्याचा आरोप केलाय. पेन्सिल्व्हेनियात पोस्टल मतदानासाठी मुदत वाढवून देण्यात आली होती. त्या निर्णयाला त्यांनी आव्हान दिलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी विल्किन्सन राज्यामध्ये पुनर्मोजणीची मागणी केली आहे. तसेच मिशिगनमधील मतमोजणीत पारदर्शकता नसल्याचं सांगत ते स्थगित करण्याची त्यांची मागणी आहे. जॉर्जियामधील अनुपस्थित राहिलेल्या मतदानाशी संबंधितही त्यांनी आव्हान दिलं आहे. मात्र सध्या जॉर्जिया आणि मिशिगनमधील न्यायाधीशांनी डोनाल्ड ट्रम्प यांची ही याचिका फेटाळून लावली आहे. ट्रम्प यांनी मिशिगनमध्ये मतमोजणीची प्रक्रिया थांबवण्याची मागणी केली होती. मात्र, न्यायाधीशांनी ट्रम्प यांचे हे दोन्ही दावे फेटाळून लावत मतमोजणीमध्ये घोटाळा नसल्याचा निर्वाळा दिला आहे. 

थोडक्यात काय... तर अनेक कारणांनी विलंब  झालेली ही निवडणूक आता कायद्याच्या कचाट्यात सापडली आहे, त्यामुळे अमेरिकेचा पुढचा राष्ट्राध्यक्ष कोण हे अधिकृतरित्या ठरायला काही आठवडेही लागू शकतात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Know why this much late in declaration of results of US Election