esakal | तैवानवर ड्रॅगनची वक्र भिवई..
sakal

बोलून बातमी शोधा

Taiwan-China

तैवानवर ड्रॅगनची वक्र भिवई..

sakal_logo
By
जतीन देसाई

नवी दिल्लीः चीन (China) आणि तैवानमध्ये (Taiwan) प्रचंड तणाव (Stress) निर्माण झाला आहे. तैवानवर चीन आक्रमण करणार की काय, अशी चर्चा सुरू झाली आहे. चीन लगेच आक्रमण करेल, अशी शक्यता दिसत नाही; पण चीनने त्या देशातील लोकांमध्ये भीती (Fear) निर्माण केली आहे. अलीकडे चीनने जवळपास १५० युद्धविमाने (Warplanes) तैवानच्या हवाई सुरक्षा प्रमाणित विभागात पाठवली. अमेरिका (America) व इतर काही राष्ट्रांनी चीनच्या या आक्रमक धोरणाचा निषेध केला आहे. तैवानच्या लष्कराला अमेरिका गुप्तपणे प्रशिक्षण देत असल्याच्या बातम्यांनी तणावात काही प्रमाणात वाढ झाली आहे.

हेही वाचा: रशियाने चोरली कोव्हिशिल्डची ‘ब्लूप्रिंट’

गेल्या दोन-तीन वर्षांपासून चीनच्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’ने (पीएलए) तैवानकडे लक्ष केंद्रित केलं आहे. भारताच्या सरहद्दीत देखील ‘पीएलए’ने बऱ्याच प्रमाणात घुसखोरी केली आहे. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी पक्ष आणि देशावरची पकड मजबूत करण्यासाठी विस्तारवादी पावले टाकली आहेत. आता चीनच्या कम्युनिस्ट पक्षातही शी जिनपिंगच्या विरोधात काही नेते बोलायला लागल्याची चर्चा आहे. शी जिनपिंग गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात म्यानमार (बर्मा) गेले होते आणि त्यानंतर त्यांनी परदेश दौरा केला नाही. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्याशीही ते व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहेत. तैवान हा आपल्याच देशाचा प्रांत असल्याचे चीन मानतो. 'वन चायना' धोरणानुसार तैवानवर कब्जा मिळवण्याचं चीनचं स्वप्न आहे. शी जिनपिंग यांनी ही महत्त्वाकांक्षा कधीच लपवली नाही. वास्तविक तैवान बेटावर चीनचा कब्जा पूर्वीही नव्हता. १९४९मध्ये चीनमधील यादवी युद्धानंतर कॉमिंटांगनी तैवान बेटाचा आश्रय घेतला. चीनने स्वतःला ‘पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना’ जाहीर केलं आणि तैवानने ‘रिपब्लिक ऑफ चायना.

चीनमध्ये हुकूमशाही आहे, तर तैवानात बहुपक्षीय लोकशाही. चीनमध्ये माध्यमांवर नियंत्रण आहे, तर तैवानात माध्यमांना स्वातंत्र्य आहे. तैवानची एकूण लोकसंख्या जवळपास दोन कोटी ३६ लाख आहे. त्या देशाने केलेली प्रगती कौतुकास्पद आहे. तो देश जगभर इलेक्ट्रॉनिक वस्तू निर्यात करतो. तैवानच्या अध्यक्षा आहेत त्साई इंग-वेन. भारत-तैवानमध्ये २००६मध्ये व्यापार होता दोन अब्ज डॉलर आणि २०२०मध्ये वाढून तो झाला ५.७ अब्ज डॉलर.

हिंद-प्रशांत विभागात तणाव

एक ऑक्टोबरला चीनने त्याचा ‘राष्ट्रीय दिवस’ साजरा करतानाच तैवानमध्ये भीती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तैवानच्या राष्ट्राध्यक्षांनी एका लेखात म्हटलं की "तैवान स्वरक्षणासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलेल. तैवानचा पराभव झाल्यास शेजारच्या प्रदेशात एक मोठं संकट निर्माण होईल." हिंद-प्रशांत विभागात तणाव असून दक्षिण चीन समुद्रात चीन आक्रमक धोरण अवलंबत आहे. काही कृत्रिम बेटे त्यांनी निर्माण केली आहेत. चीनच्या या धोरणाच्या विरोधात ‘असोसिएशन ओफ साऊथ-इस्ट एशियन नेशन्स’च्या राष्ट्रानी भूमिका घेतली आहे. हिंद-प्रशांत परिसर 'शांत, मुक्त आणि स्वतंत्र' असावा, अशी अमेरिका आणि अनेक देशाची भूमिका आहे.

हेही वाचा: सिडनीसाठी १०८वा दिवस सुदैवी

सप्टेंबरमध्ये अमेरिकेने ऑस्ट्रेलिया व ब्रिटनसोबत (ऑकस) सुरक्षा करार केला आहे. त्याचे मुख्य उद्दिष्ट हिंद-प्रशांत क्षेत्र आहे. ऑस्ट्रेलियाला अमेरिका आणि ग्रेट ब्रिटन अणू-पाणबुड्यांचे तंत्रज्ञान देणार आहे. ‘ऑकस’बद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना चीनने म्हटलं की ‘हिंद-प्रशांत भागाला पाणबुड्यांची नव्हे तर रोजगार व आर्थिक विकासाची आवश्यकता आहे." चीनची वाढती लष्करी ताकद हाच या तीन देशांच्या काळजीचा विषय आहे.

तैवानची सुरक्षा

अमेरिका गुप्तपणे तैवानची सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्यासाठी प्रयत्न करत आहे. या बातमीची चीनने गंभीर नोंद घेतली आहे. सगळ्यात आधी ही बातमी प्रसिद्ध अमेरिकी दैनिक ‘द वॉल स्ट्रीट जर्नल’ने दिली. अमेरिकी नौदलातले काही अधिकारी आणि स्पेशल ऑपरेशन्स युनिट तैवानच्या लष्कराला गुप्तपणे प्रशिक्षण देत असल्याच वृत्तांत त्यात होत. चीनच्या ‘ग्लोबल टाइम्स’ दैनिकाच्या संपादक हू शीजीन यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटलं, " २४-२५ जण? अमेरिकेने २४० जवानांना खुलेआम त्यांच्या गणवेशात पाठवावे आणि ते कुठून काम करत आहेत हे सांगावं." मात्र चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या झाओ लिजलाननी अमेरिकेची आक्रमक भाषेत टीका करण्याऐवजी अमेरिकेने तैवानशी लष्करी संबंध तोडावे, असं म्हटलं.

हेही वाचा: चीनची भारताला धमकी; युद्ध झालं तर हाराल

चीनशी तणावाचे संबंध असताना भारतासाठी तैवानच्या बाजूने उघडपणे बोलणं सोपं नाही. विशेषतः सीमेवरील तणावाच्या संदर्भात दोन्ही देशांची बोलणी सुरू असताना. चीनच्या विस्तारवादी धोरणाचा भारताला अनेक वर्षापासून त्रास होत आहे. काही दिवसापूर्वी अरुणाचल प्रदेशात चीनच्या लष्कराने घुसखोरी केली होती. त्यापूर्वी उत्तराखंडात पण जवळपास १०० चीनी जवान घुसले होते आणि लगेच ते परत गेले. तैवानला मात्र १५ देशांनी मान्यता दिली आहे आणि तीदेखील मोठी राष्ट्रे नाहीत. भारतात तैवानबद्दल लोकांमध्ये कुतूहल नि सहानुभूती आहे. भारताने तैवानशी व्यापार वाढवला पाहिजे आणि परस्परसंबंध मजबूत होतील, हे पाहिले पाहिजे.

loading image
go to top