'मी ट्रम्प यांना माफ करायला तयार नव्हते; पण तरीही व्हाईट हाऊसमध्ये केलं स्वागत'

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 18 November 2020

मिशेल यांनी म्हटलंय की, ट्रम्प यांचं स्वागत करणं तितकंही सोपं नव्हतं.

नवी दिल्ली : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची पत्नी मिशेल ओबामा यांनी आता अमेरिकेच्या निवडणूक प्रक्रियेबाबत महत्त्वाचे विधान केलं आहे. 2020 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत झालेल्या धुमश्चक्रीच्या पार्श्वभूमीवर त्यांचे हे विधान महत्त्वपूर्ण मानले जात आहे. त्यांनी सत्तेचे हस्तांतरण न करण्याबाबत डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी सोशल मीडियातील एका पोस्टद्वारे आपले मत मांडले आहे. त्यांनी म्हटलंय की, मी सर्व अमेरिकेन आणि खासकरुन आपल्या राष्ट्रीय नेत्यांना आग्रह करते की निवडणूक प्रक्रियेचा सन्मान करा. सत्तेचे हस्तांतरण सुलभरित्या होऊ द्या. अगदी तसेच जसे आपल्या देशाचे माजी राष्ट्राध्यक्ष आजवर करत आलेत. 

हेही वाचा - पंतप्रधान मोदींनी जो बायडेन यांना केला फोन; विविध मुद्द्यांवर चर्चा

मिशेल ओबामा यांनी यावेळी आठवणी जागवल्या आहेत की कशाप्रकारे बराक आणि त्यांनी मिळून ट्रम्प आणि मेलानिया यांचं स्वागत केलं होतं. तेंव्हा त्यांनी आपल्या निवडणुकीतल्या पराभवाला बाजूला सारत हा कार्यक्रम केला होता. मिशेल यांनी म्हटलंय की, ट्रम्प यांचं स्वागत करणं तितकंही सोपं नव्हतं. त्यांनी लिहलंय की, डोनाल्ड ट्रम्प यांनी माझ्या पतीच्या विरोधात वर्णभेदाच्या अफवा पसरवल्या होत्या. तसेच माझ्या परिवाराला धोक्यात टाकलं होतं. मी त्यांना या सर्व गोष्टींसाठी माफ करायला तयार नव्हते. 

मिशेल यांनी पुढे म्हटलंय की, ट्रम्प यांचं स्वागत करायला आंतरिक शक्ती आणि एका परिपक्वतेची गरज होती की ज्यामुळे जुन्या गोष्टींना विसरुन जाता येईल. तेंव्हा मिशेल ओबामा यांनी मेलानिया ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसशी संबंधित अनेक गप्पा मारल्या होत्या. तसेच त्यांनी मुलांशी निगडीत विषयांवरही चर्चा केली होती. 

हेही वाचा - ट्रम्प यांनी समन्वय साधला नाही तर अनेक अमेरिकन मृत्यूमुखी पडतील - बायडेन

अमेरिकेची निवडणूक 3 नोव्हेंबर रोजी पार पडली आहे. मात्र, या निवडणुकीचा निकाल स्पष्टरुपाने जो बायडन यांच्याबाजूने लागलेला असतानाही डोनाल्ड ट्रम्प हे आपली हार मान्य करायला तयार नाहीयेत. या निवडणुकीत घोटाळा झाल्याचा आरोप करत त्यांनी अनेक राज्यांमध्ये कोर्टात धाव घेतलीय. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: michelle obama says That wasnt something I was ready to forgive donald trump