COVID 19 Vaccine - अमेरिकेच्या मॉडर्नाने दिली खूशखबर; कोरोनावर लस ठरतेय प्रभावी

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 1 October 2020

या चाचणी अंतर्गत 40 व्हॉलेंटिअरची नोंदणी करण्यात आली. यामधील 20 लोकांचे वय हे 56 ते 70 आणि 20 लोकांचे वय हे 71 वर्षांहून अधिक आहे.

अमेरिकेच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऍलर्जी एँड इन्फेक्शियस डिसीजेस (NIAID) आणि बायोटेक कंपनी मॉडर्नाने  मिळून विकसित केलेली मॉडर्ना कोविड-19 व्हॅक्सीन ही प्रभावशाली ठरताना दिसून येत आहे. या लशीच्या चाचणीच्या पहिल्याच टप्प्यात या लशीची परिणामकारकता दिसून आली आहे. वृद्ध आणि वयस्कर लोकांमध्ये या लशीमुळे प्रतिकार शक्ती वाढत असल्याचे निष्कर्ष समोर आले आहेत.

हेही वाचा - HIVतून पूर्णपणे बरा झालेल्या जगातील पहिल्या व्यक्तीचा कँसरमुळे मृत्यू

'न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसीन' या नियतकालिकात प्रकाशित एका अभ्यासानुसार सध्या प्रायोगिक पातळीवर सुरु असलेल्या mRNA-1273 या लशीच्या चाचणीमध्ये सहभागी झालेल्या लोकांवर सकारात्मक परिणाम दिसून आले. NIAID च्या संशोधकांच्या म्हणण्यानुसार वयस्कर लोकांवर कोविड-19 मुळे अधिक त्रास होऊ शकतो. त्याचे दुरगामी परिणामदेखील त्यांच्या शरीरावर होऊ शकतात. आणि लसनिर्मिती करताना हा मुद्दा महत्वाचा ठरतो. 
NIAID च्या संशोधकांच्या म्हणण्यानुसार वयस्कर व्यक्तींसाठी लस खूप महत्वाची आहे. त्यांच्यात जर प्रतिकारशक्ती वाढवली गेली नाही तर कोविड-19 चा धोका त्यांच्यासाठी अधिक असू शकतो. म्हणूनच लस सुरक्षित असणे आणि प्रभावी असणे वृद्ध लोकांसाठी महत्वपूर्ण आहे. 

हेही वाचा - ट्रम्प यांनी पराभव झाल्यानंतर राष्ट्राध्यक्षपद सोडायला नकार दिला तर काय?

या लशीची पहिल्या टप्प्यातली चाचणी 16 मार्च 2020 रोजी सुरु झाली होती. त्यानंतर वयस्कर लोकांना नोंदणीकृत करण्यासाठी म्हणून ही चाचणी एका महिन्यासाठी वाढवण्यात आली. संशोधकांनी म्हटलंय की या चाचणी अंतर्गत 40 व्हॉलेंटिअरची नोंदणी करण्यात आली. यामधील 20 लोकांचे वय हे 56 ते 70 आणि 20 लोकांचे वय हे 71 वर्षांहून अधिक आहे. 

संशोधकांनी म्हटलंय की या लशीच्या चाचणीत व्हॉलेंटीअर्सवर चांगला प्रभाव दिसून आला. मात्र, काहींना लसीकरणानंतर हलकासा ताप आणि थोडी थकावट अशी लक्षणे दिसून आली. मात्र, ज्यांना ज्यांना ही लस देण्यात आली त्यांच्यात प्रतिकार शक्ती निर्माण झाल्याचं दिसून आलं. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: moderna covid vaccine safe working effectively on adults study