पैगंबर व्यंगचित्र वादः आयफल टॉवरजवळ दोन मुस्लिम महिलांवर चाकू हल्ला

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 21 October 2020

इस्लाम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर यांच्यावरील व्यंगचित्रावरुन फ्रान्समध्ये एका शिक्षकाचा मुस्लिम कट्टरपंथीयांनी शिरच्छेद केला होता. 

पॅरिस- इस्लाम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर यांच्यावरील व्यंगचित्रावरुन फ्रान्समध्ये एका शिक्षकाचा मुस्लिम कट्टरपंथीयांनी शिरच्छेद केल्यानंतर आता पॅरिसमध्ये आयफल टॉवरखाली दोन मुस्लिम महिलांवर चाकूने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. हल्लेखोरांनी या महिलांना शिवीगाळही केली. फ्रान्सच्या पोलिसांनी दोन संशयित महिलांना या हल्ल्याप्रकरणी अटक केली आहे. 

पोलिसांनी ज्या महिलांना अटक केली आहे, त्या यूरोपच्या असण्याची शक्यता आहे. या महिलांविरोधात आता हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी खटला चालेल, असे सांगितले जात आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्या महिला या मूळ अल्जेरिया येथील असून केंजा आणि अमेल अशी त्यांची नावे असल्याचे बोलले जात आहे. केंजा यांच्यावर सहा वेळा वार करण्यात आले असून त्यामुळे त्यांच्या फुफ्फुसाला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

हेही वाचा- मदरशांमधून दहशतवाद्यांचा जन्म, भाजपच्या महिला मंत्र्याच्या विधानाने खळबळ

अमेल यांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या हातावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. या हल्ल्याबाबत अधिकृत माहिती समजू शकलेली नाही. परंतु, सोशल मीडियावर याच्यावर प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे. अनेकांनी या हल्ल्याची छायाचित्रेही शेअर केली आहेत. हा हल्ला रविवारी रात्री झाल्याचे सांगण्यात येते. 18 ऑक्टोबर रोजी रात्री 8 वाजता दोन महिलांवर चाकू हल्ला झाल्याची माहिती आम्हाला मिळाल्याचे पॅरिस पोलिसांनी सांगितले. 

हेही वाचा- Bihar Election - Video : तेजस्वी यादवांवर भरसभेत फेकली चप्पल; व्हिडीओ झाला व्हायरल

पॅरिस पोलिस सूत्रांच्या हवाल्याने 'डेली मेल'ने दिलेल्या वृत्तानुसार, हल्ला झालेल्या महिलेने आपला चेहरा झाकला होता. केंजाने सांगितल्यानुसार त्या फिरण्यासाठी तिथे आले होते. आयफल टॉवरजवळ वॉकिंग करत असताना आमच्या बाजूने दोन श्वान आले. त्यामुळे आमची लहान मुलं घाबरली. माझ्या चुलत बहिणीने बुरखा घातला होता. मुलं घाबरल्याने तिने श्वान घेऊन आलेल्या महिलांना दूर जाण्याची विनंती केली. तरीही त्या महिलांनी दूर जाण्यास मनाई केली आणि दोघांमध्ये वाद सुरु झाला. त्यानंतर श्वान घेऊन आलेल्या महिलेने चाकू काढून केंजा आणि अमेलवर हल्ला केला. 

हेही वाचा- गुन्हेगारांची 'बिहार निवडणूक'; २० जणांवर महिला अत्याचार, २१ जणांवर हत्येचे गुन्हे

हल्लेखोर महिला चाकूने वार करताना त्या मुस्लिम महिलांना 'घाणरेडे अरबी', 'तुम्ही तुमच्या देशात निघून जा', असे म्हणत शिवीगाळही करत होत्या. त्यावेळी बाजूला असलेल्या दोन दुकानदारांनी यात हस्तक्षेप केला. या दुकानदारांनी त्यातील एका महिलेला पोलिस येईपर्यंत पकडून ठेवले होते. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Muslim Women Stabbed Under The Eiffel Tower In France Amid Prophet Cartoon‍ Controversy