धक्कादायक! टाय घातला नाही म्हणून खासदाराला संसदेतून काढलं बाहेर

टीम ई सकाळ
Wednesday, 10 February 2021

तुम्हाला सरकारला प्रश्न विचारायचे असतील तर टाय घालावाच लागेल. स्पीकरनी सांगितल्यानंतरही खासदाराने नकार दिला तेव्हा त्यांना बाहेर काढण्यात आलं.

वेलिंग्टन - जगात आजही अनेक ठिकाणी भेदभाव, वर्णद्वेषाच्या घटना घडतात. याचे पडसाद जगभरात उमटत असतात. आता न्यूझीलंडमध्ये एका आदिवासी खासदारांच्या भूमिकेमुळे वाद निर्माण झाला आहे. खासदार राविरी वेइटिटि यांनी टाय घालण्यास नकार दिल्यानंतर त्यांना संसदेतून बाहेर काढण्यात आलं आहे. यावर वेइटिटि यांनी सांगितलं की, टाय गुलामीचं प्रतिक आहे आणि आम्ही ते घालणार नाही. 

खासदार वेइटिटि यांनी म्हटलं की, टाय न घालण्याचा नियम सध्याच्या काळात योग्य नाही. याच संसदेत मेक्सिको वंशाचे खासदार आहेत जे त्यांचे पारंपरिक टाय घालतात. त्यावर कोणाला आक्षेप कसा नाही? आमच्यासारख्या आदिवासी खासदारांनाच का रोखलं जातं असा सवालसुद्धा त वेइटिटि यांनी विचारला. 

स्पीकर ट्रेवर मलॉर्ड यांनी आदिवासी खासदार राविरी वेइटिटि यांना इशारा दिला की, जर तुम्हाला सरकारला प्रश्न विचारायचे असतील तर टाय घालावाच लागेल. स्पीकरनी सांगितल्यानंतरही खासदाराने नकार दिला तेव्हा त्यांना बाहेर काढण्यात आलं. स्पीकरच्या या निर्णयावरून आता मोठा गदारोळ सुरु आहे. त्यांच्यावर टीकाही केली जात आहे. 

हे वाचा - Video : कोर्टाच्या ऑनलाइन सुनावणीत हजर राहिले मांजर; म्हणाले 'मी वकील आहे'

समाजाचं प्रतिक असलेल्या लॉकेटमुळे वाद
याआधीही वेइटिटि यांच्या वर्तनामुळे वाद निर्माण झाला होता. स्पीकरनी राविरी यांना सांगितलं होतं की, जर तुम्हाला सरकारच्या कोणत्याही मंत्र्याला प्रश्न विचारायचा असेल तर नियमानुसार टाय घालावाच लागेल. राविवी माओरी आदिवासी जमतीमधील आहेत. तसंच ते माओरी पक्षाचे नेते आहेत. यावेळी त्यांनी संसदेत टाय न घालता त्यांच्या समाजाचं प्रतिक असलेलं एक लॉकेट गळ्यात घातलं होतं. त्यानंतर सभापतींनी त्यांना चेंबरमध्ये बोलावून टाय घालणं गरजेचं असल्याचं सांगितलं होतं. मात्र त्याला नकार देत टाय गुलामीचं प्रतिक असल्याचं राविरी म्हणाले होते.

हे वाचा - म्यानमारमध्ये आंदोनाचा जोर आजही कायम राहिल्याने पोलिसांनी दडपशाहीचे धोरण स्वीकारले

टायच्या नियमाबाबत संसदेत चर्चा
गेल्या वर्षी न्यूजीलंडमध्ये टायचा मुद्दा पहिल्यांदा उपस्थित करण्यात आला होता. तेव्हा सभापतींनी सर्व खासदारांना याबाबत त्यांच्या सूचना लिखित स्वरुपात देण्यास सांगितलं होतं. त्यात बहुतांश खासदारांनी सांगितलं होतं की, टाय घालण्याचा नियम योग्य आहे. यानंतर पुढेही हा नियम कायम ठेवण्यात आला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: new zealand rawiri waititi ejected from parliament because not wearing tie

Tags
टॉपिकस
Topic Tags: