म्यानमारमध्ये आंदोनाचा जोर आजही कायम राहिल्याने पोलिसांनी दडपशाहीचे धोरण स्वीकारले

Myanmar-Agitation
Myanmar-Agitation

यांगून - म्यानमारमध्ये लष्करी सत्तेविरोधात नागरिकांनी सुरु केलेल्या आंदोनाचा जोर आजही कायम राहिल्याने पोलिसांनी दडपशाहीचे धोरण स्वीकारले आहे. पोलिसांनी आज आंदोलकांवर पाण्याच्या फवाऱ्याचा जोरदार मारा करतानाच त्यांना पांगविण्यासाठी हवेत गोळीबारही केला. 

लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या सरकारच्या हातून लष्कराने सत्ता हस्तगत केल्याच्या घटनेला नागरिकांनी तीव्र विरोध दर्शविला असून गेल्या ९ दिवसांपासून येथे आंदोलन सुरु आहे. लष्करी राजवटीने हे आंदोलन बेकायदा असल्याचे जाहीर करूनही आंदोलकांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. राजधानी न्यापीताव येथे पोलिसांनी आंदोलकांवर रबरी गोळ्यांचा मारा केला.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

यामुळे अनेक जण जखमी झाले. मंडाले येथेही पोलिसांनी दोन वेळेस हवेत गोळीबार केला. आंदोलकांना पांगविण्यासाठी पाण्याच्या फवाऱ्याचाही वापर करण्यात आला. पोलिसांच्या गोळीबारात काही जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्तही पसरले असून याबाबत खात्रीलायक माहिती मिळालेली नाही. पोलिसांच्या दडपशाहीमुळे आतापर्यंत शांततामय मार्गाने सुरु असलेले आंदोलन हिंसक बनण्याची शक्यता निर्माण झाली असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. देशाची सत्ता पुन्हा एकदा लोकशाहीवादी सरकारच्या ताब्यात द्यावी आणि नेत्या आँग सान स्यू की यांना मुक्त करावे, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. पोलिसांनी मात्र अनेक ठिकाणी अटकसत्र सुरु केले आहे. 

दरम्यान, अमेरिकेने म्यानमारमधील लष्करी राजवटीचा निषेध केला आहे. अटक केलेल्या नेत्यांना ताबडतोब सोडून त्यांच्या ताब्यात सत्ता दिली जावी, अशी मागणी अमेरिकेने केली आहे. तसेच, अमेरिका कायमच लोकशाहीच्या बाजूने ठामपणे उभी असेल, असेही यावेळी सांगण्यात आले.

म्यानमारवासीयांसाठी पुढाकार - ब्रेथवेट
संयुक्त राष्ट्रेवरील ब्रिटनचे राजदूत ज्यूलीयन ब्रेथवेट यांनी मानवी हक्क परिषदेच्या संघटनात्मक बैठकीत सांगितले की, निर्वाचित नेते आणि नागरीकांना लष्कराने अटक केल्यामुळे म्यानमारमधील मानवी हक्कांवर गंभीर परिणाम झाले आहेत. संघटनेचे चौकशी अधिकारी थॉमस अँड्र्यूज यांनी अशा धोक्याच्या आणि गरजेच्या वेळी म्यानमारवासी एकटे नाहीत हे दाखविण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावण्याचे आवाहन केले आहे. मुख्य म्हणजे तेथील जनतेची दैन्यावस्था झाल्यामुळे तसेच मानवी हक्कांची स्थिती झपाट्याने खालावत असल्यामुळे आपल्याला पुढाकार घेऊन प्रतिसाद द्यावाच लागेल.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com