INDvAUS : अदानींना कर्ज देऊ नका; मॅचदरम्यान मैदानात येऊन तरुणाची बॅनरबाजी

सकाळ वृत्तसेवा
Friday, 27 November 2020

हा सामना चालू असताना भारतीय उद्योगपती अदानी यांच्याविरोधात निषेध करत दोन ऑस्ट्रेलियन नागरिक थेट मैदानात शिरले.

सिडनी : भारत-ऑस्ट्रेलिया दरम्यान वन-डे आणि कसोटी क्रिकेट सामन्यांचा दौरा ऑस्ट्रेलियामध्ये होत आहे. या दौऱ्यातील पहिल्या वन-डे क्रिकेट सामन्याला आज सुरवात झाली. या सामन्यादरम्यान एक लक्षवेधी घटना पहायला मिळाली जी भारतासंदर्भात महत्त्वाची मानली जातेय. हा सामना चालू असताना भारतीय उद्योगपती अदानी यांच्याविरोधात निषेध करत दोन ऑस्ट्रेलियन नागरिक थेट मैदानात शिरले. दोन्ही संघामधील पहिला सामना रोखण्यासाठी म्हणून दोन आंदोलनकर्त्यांनी अदानींचा निषेध करणारे पोस्टर हातात घेऊन मैदानात घुसण्याचा प्रवेश केला. हा सामना सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर खेळवला जातोय. 

नेमकं काय घडलं?
यातील एका आंदोलनकर्त्यांच्या पोस्टरवर लिहले होते की, 'State Bank Of India No $1BN Adani Loan' म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडियाने अदानींना एक अब्ज डॉलरचे कर्ज देऊ नये. हा आंदोलनकर्ता मैदानात घुसला तेंव्हा भारतीय खेळाडू नवदीप सैनी हा सहावी ओव्हर टाकण्यासाठी तयार होता. तेंव्हा ऑस्ट्रेलियांची फलंदाजी सुरु होती. यादरम्यान ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटर ऍडम गिलख्रिस्ट कॉमेंट्री करत असताना म्हणाला की, काही व्यक्ती मैदानात घुसण्याचा प्रयत्न करताहेत. ते कशाचा तरी निषेध नोंदवत आहेत. सुरक्षा रक्षक त्यांना बाहेर काढूपर्यंत आपण वाट पाहू आणि खेळ पुन्हा सुरु करु. 

काय आहे प्रकरण ?
भारतीय उद्योगपती अदानींचा ऑस्ट्रेलियामध्ये कोळशाच्या खाणीसंदर्भातील एक प्रोजेक्ट प्रस्तावित आहे. त्यांच्या या क्विन्सलँड प्रोजेक्टला ऑस्ट्रेलियामध्ये मोठ्या प्रमाणावर नागरिकांचा विरोध आहे. हा प्रोजेक्ट सुरु होत असताना अनेकांनी 'अदानी गो बॅक' ची मोहिम देखील राबवली आहे.  या प्रोजक्टमुळे ग्लोबल वॉर्मिंगची समस्या वाढीस लागण्याची भीती या आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली आहे. यातील काही आंदोलनकर्ते आज स्टेडीयमच्या बाहेर निषेधासाठी जमले होते. ते अदानींच्या या प्रोजेक्टविरोधात घोषणाबाजी करत होते. कोरोना कहरानंतर पहिल्यांदाच क्रिकेटचे चाहते या सामन्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा खेळाचा आस्वाद घेण्यासाठी जमले आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No $1BN Adani Loan protesters hit India Australia ODI