सार्वजनिक ठिकाणी घट्ट पेहराव, चुंबन नको!

वृत्तसंस्था
रविवार, 29 सप्टेंबर 2019

- सार्वजनिक ठिकाणी स्त्रियांनी खांदे आणि गुडघे झाकणाऱ्या पोषाखातच यावे

- सभ्यतेचे नियम मोडणाऱ्यांना आकारण्यात येणार दंड. 

रियाध : सार्वजनिक ठिकाणच्या सभ्यतेचे नियम मोडणाऱ्यांना दंड आकारण्याचा निर्णय सौदी अरेबियाने घेतला आहे. त्यानुसार घट्ट पेहराव करणे किंवा सार्वजनिक ठिकाणी चुंबन घेणे, अशा कृत्यांना दंड ठोठविला जाणार आहे. 

सौदीने शुक्रवारी विदेशी पर्यटकांना व्हिसा देण्याचा निर्णय जाहीर करत पर्यटकांना आकर्षित करण्याचा निर्णय घेतला. त्याच्या दुसऱ्याच दिवशी सार्वजनिक ठिकाणी सभ्यता न पाळणाऱ्यांना दंड ठोठावला जाणार असल्याची घोषणा केली. "जगभरातील पर्यटकांना आकर्षित करण्याचा आमचा प्रयत्न आहे. मात्र, विदेशी पर्यटकांना सौदीतील नियमांची माहिती व्हावी म्हणून नव्याने यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे,'' असे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले. 

राष्ट्रवादीच्या हेडक्वार्टरमध्ये अस्वस्थता आणि खदखद !

सौदीच्या गृहमंत्रालयाने एक निवेदन प्रसिद्ध केले असून, त्यात सार्वजनिक ठिकाणी टाळावयाच्या 19 गोष्टींची यादी दिली आहे. त्यानुसार स्त्री व पुरुषांनी सार्वजनिक ठिकाणी घट्ट पेहराव करू नये, तसेच अपवित्र भाषा किंवा छायाचित्रे असलेले कपडे घालू नयेत, असे म्हटले आहे. सार्वजनिक ठिकाणी स्त्रियांनी खांदे आणि गुडघे झाकणाऱ्या पोषाखातच यावे, अशा सूचनाही करण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी चुंबन घेण्यासही मनाई करण्यात आली आहे. 

पवारांच्या मास्टर स्ट्रोकने राष्ट्रवादीला मिळाला बूस्ट

या नियमांचा भंग करणाऱ्यांना दंड आकारण्यात येणार आहे. मात्र, नेमका किती दंड आकारण्यात येईल, याची माहिती उघड करण्यात आलेली नाही. सौदीतील महिलांना सार्वजनिक ठिकाणी हिजाब वापरणे बंधनकारक आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No kissing short clothes or alcohol Saudi Arabia offers tourist visas but conditions apply