अमेरिकेने भारताला दिलेल्या पाठिंब्यामुळे चीनचा थयथयाट

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 28 October 2020

अमेरिकेने भारताच्या बाजूने पाठबळ उभे करण्याची ग्वाही दिल्यामुळे चीनचा थयथयाट सुरू झाला आहे.

नवी दिल्ली - अमेरिकेने भारताच्या बाजूने पाठबळ उभे करण्याची ग्वाही दिल्यामुळे चीनचा थयथयाट सुरू झाला आहे. सीमावाद हा भारत आणि चीनचा द्विपक्षीय मुद्दा असून त्यात तिसऱ्या पक्षाच्या हस्तक्षेपाची गरज नाही, असा चीनने अमेरिकेला इशारा दिला आहे.

चीन आणि अमेरिकेदरम्यान गेल्या काही महिन्यांपासून तणाव टोकाला पोहोचला आहे. भारत आणि अमेरिकेदरम्यान काल झालेल्या ‘टू प्लस टू’ संवादादरम्यान अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ आणि संरक्षणमंत्री मार्क एस्पर यांनी गलवान खोऱ्यात धारातीर्थी पडलेल्या भारतीय जवानांचा उल्लेख करून चीनी आक्रमकतेवर तिखट प्रहार केले होते. यामुळे चीनने आज निवेदन जारी करून अमेरिकेवर टीकास्त्र सोडले. चीनच्या भारतातील वकिलातीतर्फे हे निवेदन प्रसिद्ध करण्यात आले. 

हे वाचा - रेल्वे तिकीटावरील प्रवाशाचे नावही बदलता येणार; IRCTCची सुविधा

चीनचे म्हणणे
- शेजारी देशांच्या शांततापूर्ण विकासासाठी कटिबद्ध
- एकाधिकार गाजविण्याला ठाम विरोध
- अमेरिकेकडून चीनच्या धोक्याचा बागुलबुवा
- चीनी कम्युनिस्ट पक्षाचे नेतृत्व ही चिनी जनतेची निवड
- कोरोनाबाबतीत अमेरिका चीनवर दोषारोप करून वस्तुस्थितीचा विपर्यास करत आहे 

‘द्विपक्षीय संबंध हे एखाद्या तिसऱ्या पक्षाच्या हिताशी आणि वैध अधिकारांना बाधा आणणारे नव्हे, तर क्षेत्रीय शांतता, स्थैर्य आणि विकासाशी निगडीत असावे,’ असे भारताला सुचविताना चीनने सीमावादात अमेरिकेच्या हस्तक्षेप अमान्य असल्याचा इशारा दिला. भारत आणि चीनचा सीमावाद हा द्विपक्षीय मुद्दा आहे, राजनैतिक आणि लष्करी पातळीवरील संवादातून यावर तोडगा काढला जात आहे. दोन्ही देश हा वाद सोडविण्यासाठी सक्षम असून यामध्ये तिसऱ्या पक्षाच्या हस्तक्षेपाला स्थान नाही, असे, चीनने या निवेदनात स्पष्ट केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: no need interfair says china after two plus two india america meet