Nobel Prize 2019 : पेशींच्या प्राणवायू ग्रहणाबाबतच्या संशोधनाला नोबेल!

वृत्तसंस्था
सोमवार, 7 ऑक्टोबर 2019

नोबेल पुरस्कारासाठी देण्यात येणारी 9 लाख 14 हजार डॉलरची रक्कम या तिघांना विभागून देण्यात येईल. स्टॉकहोममध्ये 10 डिसेंबर रोजी पुरस्काराचे वितरण करण्यात येईल. पुरस्काराचे हे 110 वे वर्ष आहे. 

स्टॉकहोम : जगभरातील विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्यांना देण्यात येणारा आणि जगातील सर्वोच्च नागरी पुरस्कार अशी ओळख असलेल्या नोबेल या पुरस्कारांची घोषणा सोमवारी (ता.7) करण्यात आली. यंदा देण्यात येणाऱ्या नोबेल पुरस्कारांसाठी वैद्यकशास्त्रातील तीन शास्त्रज्ञांची निवड करण्यात आली आहे.

प्राणवायूच्या उपलब्धतेचा अंदाज आणि तो ग्रहण करण्याची पेशींची क्षमता, यावर केलेल्या संशोधनाबद्दल अमेरिकेचे पेशीसंशोधक विल्यम केलिन आणि ग्रेग सेमेन्झा आणि ब्रिटनच्या पीटर रॅटक्‍लिफ यांना या वेळचे वैद्यकशास्त्रातील नोबेल जाहीर झाले आहे. 

''प्राणवायूची शरीरातील मात्रा ही कशाप्रकारे पेशी, चयापचय क्रिया आणि शारीरिक हालचालींवर परिणाम करते, हे आपल्याला समजून घेता यावे, यासाठी या संशोधनाचा उपयोग होईल,'' असे पुरस्कार समितीने म्हटले आहे. 

''या संशोधनामुळे रक्तक्षय, कर्करोग आणि इतर आजारांशी लढा देण्यासाठी या संशोधनाचा उपयोग होऊ शकेल. प्राणवायूची (ऑक्‍सिजन) मात्रा बदलल्यानंतर त्याचा जनुकांद्वारे कसा प्रतिसाद दिला जातो आणि ती प्रक्रिया कशी नियंत्रित केली जाते, याचीही माहिती केलिन, सेमेन्झा आणि रॅटक्‍लिफ यांच्या संशोधनामुळे मिळू शकली आहे,'' असेही पुरस्कार समितीने म्हटले आहे. 

प्राणवायूच्या पेशींमधील उपलब्ध माहितीच्या आधारे विविध रोगांवरील औषधे विकसित करण्यासाठी विविध प्रयोगशाळा आणि औषध निर्माण कंपन्यांना या तिघांच्या संशोधनाने चालना मिळेल, असे पुरस्कार समितीने नमूद केले आहे. 

नोबेल पुरस्कार विजेत्यांविषयी...

केलिन हे अमेरिकेत हॉवर्डमधील ह्युजेस मेडिकल इन्स्टिट्यूटमध्ये, तर सेनेन्झा हे जॉन हाफकिन्स इन्स्टिट्यूट फॉर सेल इंजिनिअरिंगमध्ये व्हॅस्क्‍युलर रिसर्च प्रोग्रामचे संचालक म्हणून, तर रॅटक्‍लिफ हे लंडनमधील फ्रान्सिस क्रिक इन्स्टिट्यूटमध्ये क्‍लिनिकल रिसर्च विभागाचे संचालक व ऑक्‍सफर्डच्या टार्गेट डिस्कव्हरी इन्स्टिट्यूटमध्ये संचालक आहेत. 

नोबेल पुरस्कारासाठी देण्यात येणारी 9 लाख 14 हजार डॉलरची रक्कम या तिघांना विभागून देण्यात येईल. स्टॉकहोममध्ये 10 डिसेंबर रोजी पुरस्काराचे वितरण करण्यात येईल. पुरस्काराचे हे 110 वे वर्ष आहे. 

पुढील नोबेल पुरस्कारांची घोषणा 

पदार्थविज्ञानशास्त्रातील नोबेलची उद्या (मंगळवारी) घोषणा करण्यात येणार आहे. त्यानंतर बुधवारी रसायनशास्त्रातील पुरस्कार जाहीर करण्यात येतील. साहित्यातील नोबेल गुरुवारी जाहीर करण्यात येईल.

गेल्या वर्षी लैंगिक शोषणाच्या आरोपामुळे साहित्यातील पुरस्कार जाहीर करण्यात आला नव्हता. या वर्षी दोन वर्षांचे पुरस्कार जाहीर करण्यात येतील. शांततेचा नोबेल पुरस्कार हा 11 ऑक्‍टोबरला जाहीर होणार आहे. अर्थशास्त्रातला नोबेल पुरस्कार 14 ऑक्‍टोबरला जाहीर करण्यात येणार आहे.

वाचा आणखी महत्त्वाच्या बातम्या :

- Vidhan Sabha 2019 : शेतकऱ्यांना कर्जमाफी, बेरोजगारांना भत्ता; वाचा काँग्रेस-राष्ट्रवादीचा जाहीरनामा

- कुत्र्याकडून कृतज्ञतेचे अनोखे दर्शन; मालकाचा दशक्रिया विधी होईपर्यंत राहिला बसून

- #AareyForest : 'आरे'बद्दल या महत्वाच्या गोष्टी माहिती आहेत का?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nobel Prize 2019 for medicine announced to three scientist for learning how cells sense oxygen