Breaking : किम जोंग उन यांच्या तब्येतीविषय सस्पेन्स कायम; गंभीर आजारी असल्याचे निश्चित!

वृत्तसंस्था
बुधवार, 22 एप्रिल 2020

अति धूम्रपान, स्थूलपणा आणि अतिश्रम या कारणामुळे त्यांची तब्येत खालावली असल्याचे म्हटले आहे.

प्यॉंगयेंग / वॉशिंग्टन : उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन (वय ३६) यांच्या प्रकृतीविषयी जगभरात तर्कवितर्कांना उधाण आलेले असताना बुधवारी (ता.२२) उत्तर कोरियांच्या सरकारी माध्यमाने मौन पाळले.

यादरम्यान दक्षिण कोरिया, चीन आणि अमेरिकी गुप्तचरांनी कुटुंबातील स्रोतांनी दिलेल्या माहितीनुसार किम जोंग उन हे हृदय शस्त्रक्रियेनंतर गंभीर आजारी पडले आहेत. यावर व्हाईट हाऊस बारकाईने लक्ष ठेऊन असल्याचेही म्हटले आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी किम जोंग उन यांच्या तब्येतीत लवकर सुधारणा होवो, अशी सदिच्छा व्यक्त केली. ट्रम्प यांनी म्हटले की, त्यांच्या तब्येतीविषयी आलेल्या अहवालाबाबत आपल्याकडे ठोस माहिती नाही. अर्थात त्यांच्याशी आपले संबंध चांगलेच राहिले आहेत. या वेळी आपण एवढेच सांगू शकतो की, ते लवकरात लवकर बरे होवो. जर त्यांच्या तब्येतीविषयी आलेली माहिती खरी असेल तर चिंताजनक गोष्ट आहे, असे ट्रम्प म्हणाले.

- डॉक्टरांवर हल्ला करणाऱ्यांना दणका; अजामीनपात्र गुन्हा आणि दोन लाखांपर्यंत दंड

अमेरिकेच्या गुप्तचर विभागाने म्हटले की, उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन हे शस्त्रक्रियेनंतर आजारी पडले आहेत. १५ एप्रिल रोजी त्यांच्या आप्तेष्टाच्या जन्मदिन सोहळ्यात किम उपस्थित नव्हते. त्यानंतरच त्यांच्या तब्येतीविषयी चर्चा सुरू झाली. आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमात त्यांच्या प्रकृतीविषयी वेगवेगळे आडाखे बांधले जात आहेत. काहींनी ब्रेन डेड झाल्याचे म्हटले आहे, तर काहींनी त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे म्हटले आहे.

- Coronavirus : खूशखबर ! भारतात आठवड्याला बनणार पाच लाख रॅपिड टेस्टिंग किट्स

अशा स्थितीत कोरियाची अधिकृत माध्यम संस्था कोरियन सेंट्रल न्यूज एजन्सी (केसीएनए) ने आज किम जोंग उन यांच्या तब्येतीविषयी चकार शब्दही प्रसिद्ध केलेला नाही. किम जोंग उन वगळून अन्य जागतिक बातम्यांना प्राधान्य देण्यात आले आहे. सोल येथील संकेतस्थळ ‘डेली एनके’ यांनी किम जोंग यांना रुग्णालयात दाखल केल्याचे म्हटले आहे.

- फेसबुकची जिओमध्ये 43 हजार कोटींची गुंतवणूक

गेल्या ऑगस्टपासून त्यांच्या तब्येतीत चढउतार होत असल्याचे बातमीत म्हटले आहे. अति धूम्रपान, स्थूलपणा आणि अतिश्रम या कारणामुळे त्यांची तब्येत खालावली असल्याचे म्हटले आहे. नाव न सांगण्याच्या उत्तर कोरियातील एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, प्यॉगंयेंग येथील माऊंट म्योहँग रिसॉर्ट येथील व्हिलात त्यांच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: North Korean media silent on Kim Jong Un health whereabouts