
गेल्या वर्षभरापासून कोरोना नावाचा व्हायरस संपूर्ण जगभरात थैमान घालतो आहे.
बर्लिन : गेल्या वर्षभरापासून कोरोना नावाचा व्हायरस संपूर्ण जगभरात थैमान घालतो आहे. अद्याप या व्हायरसवर ना उपचार उपलब्ध आहे ना कोणती लस. मात्र, कोरोनावर आता नवनवी संशोधने प्रसिद्ध होऊ लागली आहेत. ज्यातून कोरोनाबाबतचे नवे दावे केले जात आहेत. कोरोना व्हायरससंबंधी एक नवे अध्ययन समोर आले आहे. या अध्ययनानुसार, कोरोना व्हायरस लोकांच्या नाकावाटे मेंदूत प्रवेश करु शकतो. या अध्ययनातील निष्कर्षांच्या मदतीने आता हे माहित करुन घेणं शक्य होईल की कोरोना आजाराच्या दरम्यान रुग्णामध्ये कोणती न्यूरॉलॉजिकल लक्षणे दिसून येत आहेत तसेच त्यांच्यावर काय उपचार करता येतील.
हेही वाचा - जागतिक पातळीवर या वर्षभरात हा शब्द सर्वाधिक वापरला गेला; कोणता ते वाचा
नेचर न्यूरोसायन्स या जर्नलमध्ये हे अध्ययन प्रकाशित झालं आहे. या अध्ययनानुसार, SARS-CoV-2फक्त श्वसन प्रक्रियेलाच बाधित करत नाही तर आपल्या मज्जातंतूवरही परिणाम करतो. यामुळे वेगवेगळे न्यूरॉलॉजिकल लक्षणे जसे की वास न घेता येणे, चव न घेता येणे, डोकेदुखी, थकवा आणि चक्कर इत्यादी परिणाम दिसून येतात.
या नव्या अध्ययनात मेंदूमध्ये व्हायरल 'आरएनए' आणि सेरेब्रोस्पायनल फ्ल्यूड' विषयी माहिती देण्यात आली आहे. मात्र, अद्याप हे स्पष्ट नाहीये की व्हायरस कुठून प्रवेश करतो आणि कसा पसरतो. जर्मनीच्या चॅरिटे विश्वविद्यालयाच्या संशोधकांनी श्वसनमार्गाचे परिक्षण केले. या अध्ययनात कोविड-19 ने मरणाऱ्या 33 रुग्णांवर अभ्यास करण्यात आला. त्यामध्ये 11 महिला आणि 22 पुरुष होते.
हेही वाचा - बायडेन प्रशासनात महिलांचे वर्चस्व; भारतीय वंशाच्या या महिलेचा होणार समावेश
त्यांनी म्हटलं की, मरणाऱ्यांचे सरासरी वय 71.6 वर्षे होते. तर कोरोना लक्षणे दिसण्यापासून ते त्यांच्या मृत्यूपर्यंतचा सरासरी वेळ 31 दिवसांचा होता. संशोधकांचं म्हणणं आहे की त्यांना मेंदू आणि श्वसनमार्गात SARS-CoV-2 आरएनए आणि प्रोटीन सापडले आहेत.