Nobel Prize 2019 : मानवी जीवनशैलीवर भाष्य करणाऱ्यांना साहित्यातील 'नोबेल'!

वृत्तसंस्था
Thursday, 10 October 2019

दोन्ही वर्षांसाठीचा साहित्य क्षेत्रातील 'नोबेल' सन्मान गुरुवारी (ता.10) जाहीर करण्यात आला. तत्पूर्वी, मागील वर्षी स्वीडिश ऍकॅडमीमधील ज्युरींवर लैंगिक छळवणुकीचा आरोप झाल्यानंतर मागील वर्षी या पुरस्काराला ब्रेक लागला होता.

स्टॉकहोम : 'नोबेल' पुरस्कार समितीने अखेर साहित्य क्षेत्रातील सन्मानांची घोषणा केली. या क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दलचा यंदाचा म्हणजे 2019 साठीचा 'नोबेल' सन्मान हा ऑस्ट्रियन लेखक पीटर हँडके यांना जाहीर झाला असून, मागील वर्षीचा म्हणजेच 2018 साठीचा सन्मान हा पोलिश लेखिका ओल्गा टोकारचूक यांना प्रदान करण्यात येईल.

दोन्ही वर्षांसाठीचा साहित्य क्षेत्रातील 'नोबेल' सन्मान गुरुवारी (ता.10) जाहीर करण्यात आला. तत्पूर्वी, मागील वर्षी स्वीडिश ऍकॅडमीमधील ज्युरींवर लैंगिक छळवणुकीचा आरोप झाल्यानंतर मागील वर्षी या पुरस्काराला ब्रेक लागला होता. 

यंदाचा 'नोबेल' सन्मान जाहीर झालेले ऑस्ट्रियन लेखक पीटर हँडके यांनी त्यांच्या विविध साहित्यकृतींमधून मानवी अनुभवांना उत्कट अशा भाषाशैलीमध्ये मांडले. वाचकांच्या थेट काळजाला भिडणारी त्यांची भाषा सर्वप्रकारच्या सीमा ओलांडते, असे पुरस्कार समितीने म्हटले आहे.

ओल्गा टोकारचूक यांची पोलंडमधील विद्वान लेखकांमध्ये गणती होते. आपल्या साहित्यामधून कल्पनांची अभिव्यक्ती मांडताना त्यांनी त्यांचा अभ्यासू बाणा जपला आहे. त्यांच्या साहित्यातील जीवनानुभव सर्वप्रकारच्या मर्यादांपलीकडे जाणारा असल्याचे समितीने म्हटले आहे.

टोकारचूक यांच्या कादंबऱ्यांमध्ये बहुरंगी जगाची चित्रपटाच्या धाटणीने मांडणी करण्यात आली असून, त्यांच्या साहित्यामधील पात्रेही नियतीच्या एका अपरिहार्य भोवऱ्यामध्ये अडकलेली दिसतात. त्यांच्या या मांडणीला काव्यात्मक आणि साहित्यिक अधिष्ठानदेखील आहे, असे गौरवोद्गार पुरस्कार समितीने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात काढले आहे. 'नोबेल' सन्मानाच्या मानकरी ठरलेल्या ओल्गा टोकारचूक या जगातील पंधराव्या महिला ठरल्या आहेत. 

परिणामकारक साहित्य 

हँडके यांच्या साहित्याकृतीही जगावर परिणाम करणाऱ्या आहेत. दुसऱ्या जागतिक महायुद्धानंतर युरोपातील सर्वाधिक प्रभावशाली लेखक म्हणून त्यांचा उदय झाला. त्यांच्या साहित्यातून शोधाची तीव्र इच्छाशक्ती दिसून येते. नव्या साहित्य जाणिवांतून त्यांनी हा शोध पुस्तकाच्या रूपातून मांडण्याचा प्रयत्न केल्याचे स्वीडिश ऍकॅडमीने म्हटले आहे.

वाचा आणखी महत्त्वाच्या बातम्या :

- स्वर्गाची दारं पर्यटकांसाठी पुन्हा खुली; पर्यटकांसाठी काश्मीर खुलं

- Vidhan Sabha 2019 : मुख्यमंत्री म्हणाले, 'शरद पवारांची अवस्था शोलेमधल्या जेलरसारखी!'

- #BalaTrailer : पुरुषांच्या चिंतेच्या विषयावर आयुष्मान घेऊन आलाय नवा सिनेमा; ट्रेलर पाहाच!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Olga Tokarczuk for 2018 and Peter Handke for 2019 won Nobel Prize for Literature