Vidhan Sabha 2019 : मुख्यमंत्री म्हणाले, 'शरद पवारांची अवस्था शोलेमधल्या जेलरसारखी!'

CM-Devendra-Fadnavis
CM-Devendra-Fadnavis

अकलूज : ''निवडणूक लागली असताना काँग्रेसचे प्रमुख नेते बँकाँकला फिरायला गेले आहेत. तर शरद पवारांची अवस्था 'आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, बाकी सब मेरे पीछे आओ' अशी झाली आहे,'' अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर निशाणा साधला.

माळशिरस येथील महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ गुरुवारी (ता.10) नातेपुते येथे आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. मुख्यमंत्री पुढे म्हणाले, या निवडणुकीत आमची लढाई कोणाशी आहे, हेच कळत नाही. समोर कोणीच दिसत नाही. आमचे पैलवान तेल लावून तयार आहेत, पण समोर लढणारा पैलवान तयार नाही, अशी काँग्रेस-राष्ट्रवादीची अवस्था झाली आहे. या निवडणुकीचा निकाल स्पष्ट आहे. भाजपा-शिवसेना मित्रपक्षाच्या महायुती अभूतपूर्व यशाने निवडून येणार याबाबत शंका नाही,'' असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

राम सातपुतेसारख्या तरुण नेत्याला आम्ही संधी दिली. विद्यार्थी चळवळीतून ते पुढे आले आहेत. 24 तारखेला हा युवा नेता आमदार म्हणून पुढे येणार आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीने आपली हार आधीच मान्य केली आहे. 

कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्प हा अतिशय महत्त्वपूर्ण आणि सर्वांच्या जिव्हाळ्याचा आहे. पश्चिम महाराष्ट्रातील वाहून जाणारे पावसाचे आणि महापूराचे पाणी अडवले आणि योग्य दिशेने वळवले, तर राज्यातील बराच भाग सिंचनाखाली येणार आहे. त्यासाठी 22 तज्ज्ञांची समिती नेमून कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्पास तत्वत: मान्यता घेण्यात आली आहे. येत्या पाच वर्षांत स्थिरीकरण प्रकल्प पूर्ण करण्यासाठी पूर्ण क्षमतेने काम केले जाईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. 

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, गेल्या 5 वर्षांत शेतकऱ्यांना 50 हजार कोटी रुपये दिले, पश्चिम महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात प्रलंबित सिंचनाची कामे पूर्ण करण्यासाठी युती सरकारने निधी दिला. जलयुक्त शिवारसाठी योजना केली. सोलापूर जिल्ह्यातील 923 गावे दुष्काळमुक्त केली. दीड लाख लोकांना विहिरी दिल्या. तसेच सांगली, सातारा, कोल्हापूर येथे यंदा महापूर आला, मात्र आता पूराचं पाणी दुष्काळी भागात वळविण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. शेतकरी कधी अडचणीत येणार नाही, दुष्काळाचं सामना करावा लागणार नाही. येत्या 5 वर्षात हे स्वप्न पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. 

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचेही कौतुक केले. ते पुढे म्हणाले, ''मोदींच्या नेतृत्वात अमेरिकेत 1 लाख लोकांची सभा झाली. त्या सभेत डोनाल्ड ट्रम्प उपस्थित होते. या पूर्वी कोणत्याही भारतीय नेत्याची अमेरिकेत सभा झाली, तरी अमेरिकेचा एक मंत्रीही उपस्थित नसायचा. मोदी फक्त भारताचे नाही, तर जगाचे नेते आहेत. त्यांचे वैश्विक नेतृत्व जगाने मान्य केलं आहे.''

यावेळी मंचावर माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील, सहकार महर्षी कारखान्याचे अध्यक्ष जयसिंह मोहिते-पाटील, बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते-पाटील, शिवामृत दूधसंघाचे अध्यक्ष धैर्यशील मोहिते-पाटील यांच्यासह महायुतीच्या घटक पक्षांचे नेते उपस्थित होते.

विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते मुख्यमंत्र्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी करमाळा तालुक्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या सात संचालकांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.

वाचा आणखी महत्त्वाच्या बातम्या :

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com