सगळ्यांत आनंदाची बातमी; ऑक्सफर्ड विद्यापीठाला कोरोनावर लस शोधण्यात यश

रविराज गायकवाड
Monday, 20 July 2020

लँसेटचे संपादक रिचर्ड होर्टन यांनी रविवारी ट्विट केल्यानंतर ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीकडून वॅक्सिनबाबत मोठी घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती.

लंडन (Oxford Coronavirus Vaccine): कोरोना व्हायरसने चिंतेत असलेल्या संपूर्ण मानव जातीला कोरोनावर लस केव्हा उपलब्ध होणार याची उत्सुकता आहे. अमेरिकेसह, युरोपीय देश, आशियात चीन, भारत या देशांमध्ये कोरोनाने अक्षरशः हाहाकार केला आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाची लस कोण उपलब्ध करून देणार, याकडं सगळ्यांचं लक्ष लागलंय. यात ऑक्सफर्ड विद्यापीठानं (University of Oxford)आघाडी घेतलीय. या संदर्भात बीबीसीने वृत्त प्रसिद्ध केले आहे.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

कोरोनावर लस उपलब्ध व्हावी, यासाठी जगातील कानाकोपऱ्यात संशोधन सुरू आहे. लशीच्या संशोधनाचा (Corona Vaccine) दुसरा-तिसरा टप्पा सुरू असून, मानवी चाचण्या घेण्यात येत आहेत. या चाचण्यांना यशही येत आहे. यात इस्रायल, रशिया, चीन या देशांनी कोरोनावर लस शोधल्याचा दावा यापूर्वीही केला होता. रशियातील, गॅमलेई नॅशनल रिसर्च सेंटर फॉर एपिडेमियोलॉजी अँड मायक्रोबायोलॉजी या संस्थेने पहिली लस शोधल्याचा दावा केला होता. पण, या सगळ्यांत ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या संशोधनाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. ऑक्सफर्ड विद्यापीठानं कोरोनावर लस तयार केली असून, ती सुरक्षित असल्याचं स्पष्ट केलंय. या लसीमुळं शरिरात रोग प्रतिकारक शक्ती मोठ्या प्रमाणावर वाढते आणि कोरोनाशी दोन हात करता येतात, असा दावाही करण्यात आलाय. 

आणखी वाचा - भारतातल्या कोरोना लसीचं काय झालं?

या ट्विटमुळे सुरू झाली चर्चा 
लँसेटचे संपादक रिचर्ड होर्टन यांनी रविवारी ट्विट केल्यानंतर ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीकडून वॅक्सिनबाबत मोठी घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. रिचर्ड होर्टन यांनी फक्त चारच शब्दांत ट्विट केलं होतं. Tomorrow. Vaccine. Just Saying एवढंच ट्विट त्यांनी केलं होतं. त्यानंतर ट्विटरवर वॅक्सिनवरून ट्रेंडही सुरू झाला होता. जगभरात सध्या जागतिक आरोग्य संघटना 140 वॅक्सिनचं परीक्षण करत आहे. यापैकी जवळपास 20 हून अधिक वॅक्सिन मानवी चाचणीच्या वेगवेगळ्या टप्प्यात पोहोचले आहे.

संपूर्ण जगाला कोरोनानं घेरलं
गेल्या सात महिन्यापासून जगभरात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. कोरोनावर लस शोधण्यासाठी जगातील अनेक देशांमध्ये संशोधन सुरू आहे. जगात आतापर्यंत दीड कोटीहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 6 लाखांहून अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनापासून वाचण्यासाठी सध्या सोशल डिस्टन्सिंग हाच एकमेव मार्ग आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: oxford university coronavirus vaccine safe trains immune system