पाकिस्तान विमान अपघात : पायलटने मदतीसाठी साधला होता संपर्क

टीम ई-सकाळ
Friday, 22 May 2020

‘पीके-८३०३’ या विमानातून ९९ प्रवासी आणि आठ कर्मचारी प्रवास करत होते. जिन्ना गार्डन परिसरानजीक मॉडल कॉलनीमध्ये हे विमान कोसळले.

कराची  : पाकिस्तान ‘इंटरनॅशनल एअरलाईन्स’चे लाहोरहून कराचीच्या दिशेने निघालेले एक प्रवासी विमान कराचीतील जिन्ना आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ कोसळून झालेल्या भीषण अपघातामध्ये शंभरपेक्षाही अधिक लोक ठार झाल्याची भीती असून, अन्य शेकडोजण जखमी झाले आहेत. हा अपघात स्थानिक प्रमाणवेळेनुसार साधारणपणे दुपारी अडीचच्या सुमारास घडला. हे विमान नागरीवस्तीत कोसळल्याने अनेक घरांमध्ये आगी लागल्या तर काही ठिकाणांवर स्फोट झाल्याने अनेकजण त्यात भाजले गेले. 

आणखी वाचा - इटलीतील ही आकडेवारी जगाला दिलासा देणारी

दरम्यान, अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे. हे विमान कोसळण्यापूर्वी एक मिनिट आधीच त्याचा नियंत्रण कक्षाशी असलेला संपर्क तुटला होता अशी माहिती सूत्रांनी दिली. ‘पीके-८३०३’ या विमानातून ९९ प्रवासी आणि आठ कर्मचारी प्रवास करत होते. जिन्ना गार्डन परिसरानजीक मॉडल कॉलनीमध्ये हे विमान कोसळले. या विमानाच्या कप्तानाने ते कोसळण्यापूर्वीच लँडिग गिअरमध्ये तांत्रिक समस्या असल्याचे नियंत्रण कक्षाच्या लक्षात आणून दिले होते अशी माहिती विमान कंपनीच्या प्रवक्त्याने दिली.

आणखी वाचा - पाकिस्तानात इमरान खान यांचे नापाक इरादे

विमान कोसळल्याने अनेक गाड्यांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखालून चार मृतदेह हस्तगत करण्यात आले होते तर अन्य जखमींना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघाताचे वृत्त समजताच पाकिस्तानचे लष्कर आणि हवाई दलाची एक तुकडी तातडीने घटनास्थळी रवाना झाली. 

आणखी वाचा - कोरोनाच्या काळातही चीननं संरक्षणावरचं बजेट वाढवलं

घटनास्थळी धुराचे लोट 
हे विमान कोसळल्यानंतर या भागात मोठा स्फोट झाला तसेच धुराचे लोट आकाशात जाताना दिसल्याचे डॉन या वृत्तपत्राच्या संकेतस्थळाने म्हटले आहे. या अपघातानंतर अग्निशमन दलाचे बंब तातडीने घटनास्थळी रवाना झाले. अनेक घरांमध्ये विमानाचे इंधन पसरल्याने तिथे आगी लागल्या होत्या, या अपघातानंतर पाकिस्तानी लष्कराची हेलिकॉप्टरेही घटनास्थळी रवाना झाली. काही लोक ढिगाऱ्यांखाली अडकले असल्याने त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याचे काम सुरू होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pakistan karachi plane crash pilot contact control room