भारताच्या भूमिकेमुळे पाकला दणका; दहशतवादाला पोसणाऱ्या देशांच्या यादीत नाव कायम

सकाळ वृत्तसेवा
Friday, 23 October 2020

इम्रान खान यांच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान सरकारचा दहशतवादाला पोसणाऱ्या देशांच्या यादीतील नाव काढण्याचा प्रयत्न धुळीस मिळाला आहे. याविषयीच्या जागतिक शिखर संघटनेने पाकला ग्रे लिस्टमध्येच ठेवले.

पॅरिस - इम्रान खान यांच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान सरकारचा दहशतवादाला पोसणाऱ्या देशांच्या यादीतील नाव काढण्याचा प्रयत्न धुळीस मिळाला आहे. याविषयीच्या जागतिक शिखर संघटनेने पाकला ग्रे लिस्टमध्येच ठेवले असून आणखी खूप काही करण्याची गरज असल्याचेही सुनावले. भारताचा आक्रमक पवित्रा यात महत्त्वाचा ठरला.

आर्थिक कृती कार्य दल (फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्स-एफएटीएफ) या संघटनेने हा निर्णय घेतला. पाकला २७ कलमी कृती योजनेवर कार्यवाही करण्यात अपयश येणे हे याचे मुख्य कारण आहे. इम्रान यांनी आपली मोहीम यशस्वी व्हावी म्हणून कॅपीटॉल हिल या अमेरिकेतील प्रसिद्ध कंपनीची मदत घेतली होती.

पाकच्या दहशतवादी धोरणाची झळ बसलेल्या भारताने शुक्रवारच्या बैठकीच्या प्रारंभीच या घडामोडींना दिशा दिली. दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान सुरक्षित आश्रयाचे ठिकाण असल्याचे भारताकडून स्पष्ट करण्यात आले. जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझर, लष्करे तैबाचा कारवाया तडीस नेणारा म्होरक्या झकीउर रेहमान लखवी आणि दाऊद इब्राहीम अशा संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या यादीत समावेश झालेल्या दहशतवाद्यांची उदाहरणे देण्यात आली.

हे वाचा - "पैगंबरांवर टीका करणाऱ्या भारतीयांना मुस्लीम देशांनी तुरुंगात टाकावे''

जून २०१८ मध्ये पाकिस्तानला या यादीत टाकण्यात आले होते. दहशतवादी गटांविरुद्ध कारवाई करण्यात सातत्याने अपयश येत असल्याबद्दल लाल ध्वज उंचावण्यात आला होता. दहशतवाद्यांवरील कारवाईच्या मार्गात कायदेविषयक चौकटीतील त्रुटी दूर करण्यात अपयश आल्याचा ठपकाही ठेवण्यात आला होता. त्यानंतर आपण पावले उचलत असल्याचे दाखविण्यासाठी पाकने ठराविक काळाने काही पावले टाकली, मात्र शक्य होईल तेव्हा हे बदल मागे घेण्यावरून पाकला टीकेला सामोरे जावे लागले.

२०१८ मध्ये काळ्या यादीत नाव जाऊ नये म्हणून पंजाब प्रांतातील सात हजार सहाशे दहशतवाद्यांचा कायद्याचे संरक्षण नसलेल्या व्यक्तींच्या यादीत सात हजार ६०० नावांचा समावेश करण्यात आला, मात्र नंतर यातील सुमारे तीन हजार आठशे नावे गुपचूप काढून टाकल्याचे अमेरिकास्थित कॅस्टेलम डॉट एआय या संस्थेने उघडकीस आणले.
शस्त्रसंधीच्या भंगाची माहिती

हे वाचा - कट्टर विरोधकावर विषप्रयोग; पुतीन यांनी सोडलं मौन

जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानने कोणतीही चिथावणी नसताना तीन हजार आठशे वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. सीमारेषेवर शस्त्रास्त्रे टाकणे, ड्रोनचा वापर करून आंतरराष्ट्रीय सीमेवर शस्त्रास्त्रांची तसेच अंमली पदार्थांची तस्करीही पाक करीत असल्याची माहिती भारताकडून देण्यात आली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pakistan remain in gray list india stand important