संकटात पंतप्रधानांना आठवला 'राम'; शेजारील राष्ट्रात मंदिर उभारणीला सुरुवात 

सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, 31 January 2021

राजकीय आणि कायदेशीर अडचणींनी वेढलेले नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली (PM K.P Sharma Oli) सध्या चर्चेमध्ये आहेत.

काटमांडू- राजकीय आणि कायदेशीर अडचणींनी वेढलेले नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली (PM K.P Sharma Oli) सध्या चर्चेमध्ये आहेत. त्यांनी पुन्हा एकदा राम मंदिराचा राग छेडला आहे. ओली म्हणालेत की नेपाळमध्ये राम मंदिर (Ram Mandir) निर्माणाचे काम सुरु झाले आहे. चितवनमध्ये नेपाळ कम्युनिस्ट पार्टीच्या नेत्यांना संबोधित करताना ते म्हणाले की, नेपाळच्या बीरगंजमध्ये मंदिराच्या उभारणीसाठी काम सुरु झाले आहे. 

काही दिवसांपूर्वी पंतप्रधान केपी ओली यांनी राम मंदिराविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. राम मंदिराचे जन्मस्थान भारताच्या अयोध्येमध्ये नसून नेपाळमध्ये असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. त्यामुळे वाद निर्माण झाला होता. ओली यांनी भारतविरोधी वक्तव्य करणे सुरुच ठेवले. त्यांच्या राम मंदिरासंबंधी वक्तव्याने त्यांनी भारताचा रोष ओढावून घेतला आहे. 

कंगणानं केलं नथुराम यांचं समर्थन म्हणे, 'आपल्यापासून सत्य लपवलं'

चितवनमध्ये ओली म्हणाले की अयोध्यापुरीमध्ये राम मंदिर निर्माणासाठी एक मास्टर प्लॅन तयार करण्यात आला आहे. रामाची मूर्ती तयार झाली आहे. देवी सीतेची मूर्ती बनवण्याचे काम सुरु आहे. ओली यांनी सांगितलं की मंदिरात लक्ष्मण आणि हनुमानाच्या मूर्तीची स्थापना केली जाईल. ओली यांच्या म्हणण्यानुसार पुढील वर्षी राम नवमीला भगवान रामाच्या जन्मस्थळी भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात येईल.  

पर्यटन स्थळ बनवण्याची योजना

ओली म्हणाले की, राम मंदिराच्या निर्मितीनंतर, चितवन क्षेत्राला एक उत्कृष्ट पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यात येईल. चितवन संपूर्ण जगात हिंदू, मानव सभ्यता आणि संस्कृतीचे एक आकर्षन केंद्र बनेल. दरम्यान, नेपाळची संसद बरखास्त करण्यात आल्याने देशात पुन्हा एकदा निवडणुका घेण्याची तयारी सुरु करण्यात आली आहे. ओली यांच्या नेपाळी कम्युनिस्ट पार्टीत फूट पडली आहे. हे प्रकरण सुप्रीम कोर्टात पोहोचले आहे. 

ओवैसींनी काँग्रेसला म्हटलं 'बँड बाजा पार्टी'; 'भाजपची B टीम...

मागील वर्षी केलं होतं वादग्रस्त वक्तव्य

मागील वर्षी ओली यांनी वादग्रस्त वक्तव्य करत म्हटलं होतं की भगवान रामाचा जन्म बीरगंजजवळ झाला होता आणि खरी अयोध्या नेपाळमध्ये आहे. तसेच भगवान राम नेपाळी आहेत, ते भारतीय नाहीत. ओली यांनी त्यांना सत्तेतून हटवण्यामागे भारताचा हात असल्याचा आरोप केला आहे. ओली यांच्या या वक्तव्याचा भारताने निषेध केला. ओली यांना पक्षातूनही विरोध झाला होता. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PM KP Sharma Oli Ram Mandir nepal politics controversy communist party