
युक्रेन-रशिया युद्धात कोणीही जिंकणार नाही, PM मोदींचं जर्मनीत वक्तव्य
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi Europe Tour) सध्या युरोप दौऱ्यावर आहेत. ते सोमवारी जर्मनीला पोहोचले. त्यांनी तिथे जर्मनीचे चान्सलर ओलाफ शोल्ज यांच्यासोबत चर्चा केली. यावेळी पंतप्रधान मोदींनी युक्रेन-रशिया युद्धावर (Ukraine Russia War) भाष्य केले असून या युद्धामुळे भारत खूप चिंतेत आहे. भारत शांततेच्या बाजूने असून चर्चा हा एकमेव उपाय आहे, असं मोदी म्हणाले.
हेही वाचा: लोकसभा निवडणुकांचं बिगुल जर्मनीतून; पंतप्रधान मोदी येताच...
युरोपियन देशांनी युक्रेन-रशिया युद्धाचा निषेध म्हणून रशियावर निर्बंध लादण्यात आले. याबाबत देखील एक ठराव मांडण्यात आला होता. यावेळी भारताने तटस्थ भूमिका घेतली होती. तसेच यापूर्वी झालेल्या बैठकांमध्ये भारताने नेहमीच तटस्थ भूमिका घेतली आहे. त्यानंतर आता पंतप्रधान मोदी युरोप दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी युक्रेन-रशिया युद्धावर भाष्य केलं आहे. या युद्धामध्ये कोणीही जिंकणार नाही. या युद्धाचे गरीबांवर आणि विकसनशील देशांवर वाईट परिणाम झाले आहेत. अनेक देशांमध्ये तेलाचा तुटवडा निर्माण झाला असून तेलाच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. काही देशांमध्ये अन्नाचा तुटवडा निर्माण झाला आहे, असं मोदी म्हणाले. तसेच त्यांनी युद्धामध्ये ठार झालेल्या नागरिकांप्रती देखील दुःख व्यक्त केले.
पंतप्रधान मोदींनी बर्लिनला पोहोचल्यावर कुलपती कार्यालयाच्या (चान्सरी) प्रांगणात पारंपारिक गार्ड ऑफ ऑनरची पाहणी केली. चान्सलर ओलाफ शोल्ज यांनी पंतप्रधान मोदींचे येथे स्वागत केले. शिष्टमंडळ स्तरावरील चर्चेपूर्वी दोन्ही नेत्यांनी चहापानावर चर्चा केली. दोन्ही नेत्यांमधील 6 व्या भारत-जर्मनी आंतरशासकीय सल्लामसलत (IGC) कार्यक्रमापूर्वी ही चर्चा झाली. दोन्ही नेत्यांनी व्यवसाय आणि सांस्कृतिक संबंधांना चालना देण्यासह द्विपक्षीय संबंधांवर चर्चा केली. प्रादेशिक आणि जागतिक घडामोडींवर चर्चा केली
पंतप्रधान जर्मनीतील भारतीय समुदायालाही संबोधित करणार आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, या भेटीमुळे भारत-जर्मन संबंध अधिक दृढ होतील. बर्लिननंतर पंतप्रधान 3 मे रोजी डेन्मार्क येथे ते त्यांचे समकक्ष मेटे फ्रेडरिकसन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील. तेथे ते दुसऱ्या भारत-नॉर्डिक शिखर परिषदेला उपस्थित राहतील. त्यांच्या दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात पंतप्रधान मोदी फ्रान्समध्ये जाणार आहेत.
Web Title: Pm Modi Europe Tour Statement On Ukraine Russia War
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..