मोठी बातमी : कोरोनाचे राजकीय पडसाद; इटलीच्या पंतप्रधानांचा राजीनामा

टीम ई-सकाळ
Tuesday, 26 January 2021

कोरोनाच्या मृतांच्या आकड्यात इटलीचा जगात सहावा क्रमांक लागतो. या सगळ्याचे राजकीय परिणाम दिसल्यानंतर काँते यांनी पदाचा राजीनामा दिला आहे.

रोम Italy Rome : गेल्या वर्षभरात इटलीमध्ये कोरोनाने कहर केल्यानंतर, उमटलेल्या राजकीय पडसादांनंतर आता पंतप्रधान जीसेपे काँते पदावरून पायउतार होत आहेत. काँते यांनी आपला राजीनामा राष्ट्रपतींकडे सुपूर्द केला आहे. गेल्या आठवड्यात सिनेटच्या वरिष्ठ सभागृहात काँते यांनी आपले बहुमत गमावले होते. त्यानंतर त्यांना आपला राजीनामा दिला आहे. इटलीला कोरोनाच्या लाटेचा सर्वाधिक फटका बसला. इटलीत कोरोनाचे 85 हजार बळी गेले आहेत. युरोपमध्ये ब्रिटननंतर इटलीमध्ये सर्वाधिक कोरोना बळी गेले आहेत. तर, कोरोनाच्या मृतांच्या आकड्यात इटलीचा जगात सहावा क्रमांक लागतो. या सगळ्याचे राजकीय परिणाम दिसल्यानंतर काँते यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. आपल्याला बहुमत सिद्ध करण्याची आणखी एक संधी मिळेल, अशी आशा काँते यांना आहे.

आणखी वाचा - लाल किल्ल्यावर खलिस्तानी झेंडा? वाचा वास्तव

आणखी वाचा - दिल्लीची स्थिती नियंत्रणात, शेतकरी माघारी फिरले

काय घडले कसे घडले?
काँते यांना इटालिया विवा या पक्षाचा पाठिंबा होता. इटलीचे माजी पंतप्रधान माट्टोई रेन्झी यांच्या या पक्षाने काँते सरकारचा पाठिंबा काढून घेतला आहे. कोरोना काळातील परिस्थिती हाताळण्यात सरकार अपयशी ठरल्याचा मुद्दा उपस्थित करत, इटालिया विवाने सरकारचा पाठिंबा काढून घेतला. त्यामुळं काँते यांच्या नेतृत्वाखालील सरकार अल्पमतात आले. त्यामुळे इतर अपक्ष, सदस्यांचा पाठिंबा मिळवण्याच्या काँते यांच्या प्रयत्नांना माफक यश आले. त्यामुळे त्यांच्यापुढे पदाचा राजीनामा देण्याशिवाय पर्याय राहिला नाही. काँते यांनी राष्ट्रपती सेरजिओ मॅट्टारेल्ला यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला आहे. त्यानंतर मॅट्टारेल्ला उद्या बुधवारपासून सर्व पक्षाच्या नेत्यांसोबत चर्चेला सुरुवात करणार आहेत. त्यानंतर काँते, सभागृहात मतांची गोळाबेरीज करून, बहुमत सिद्ध करू शकतात, असा विश्वास जर मॅट्टारेल्ला यांना, वाटला तर, ते काँते सरकारला बहुमत सिद्ध करण्याची संधी देऊ शकतात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: political crisis italy prime minister giuseppe conte resigns