कोरोनासंदर्भात चौकशीच करायची असेलच तर...; चीनचे परराष्ट्रमंत्री काय म्हणाले पाहा!

Wang-yi_China
Wang-yi_China

बीजिंग : कोरोना विषाणूच्या संसर्गामूळे जगभरातील बहुतेक देश चीनवर नाराज झाले आहेत. अमेरिका, ऑस्ट्रेलिया यासोबतच युरोपातील काही राष्ट्रांनी चीनमधील वुहान शहरातून जगभरात संसर्ग परसल्यासंदर्भात तपास करण्याची मागणी केली होती. यामुळे चीन आणि इतर राष्ट्रांचे संबंध गेल्या काही दिवसांपासून ताणले गेले होते.

चीनने मागील काही दिवसांपासून वेळोवेळी कोरोनाशी संबंधित आपले स्पष्टीकरण दिले आहे. मात्र, आता चीन कोरोनाच्या मुद्द्यावर नमते घेत असल्याची परिस्थिती निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. संपूर्ण जगभरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५३ लाखांच्याही पुढे पोहोचली आहे. तर या विषाणूच्या संसर्गाने ३ लाख ४१ हजार ५४९ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

कोरोना विषाणूच्या संसर्गाने जगभरातील सर्वच देशांनी चीनला वेठीस धरले आहे. कोरोनामुळे जगभरातील सगळ्याच देशात सध्या भीतीचे वातावरण पसरले आहे. चीनच्या वुहान शहरातून सुरवात झालेल्या या विषाणूचा संसर्ग संपूर्ण जगभर झाला आहे. त्यामुळे जगभरातील बहुतांश देश चीनबद्दल साशंक आहेत. त्यातल्या त्यात अमेरिकेने तर चीनवर जोरदार टीका केली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेतसुद्धा याचे जोरदार पडसाद उमटले आहेत. अमेरिकेने जागतिक आरोग्य संघटनेला दोषी ठरवत मदतनिधी रोखला आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय दबावासमोर चीन नरमाईची भूमिका घेत असल्याचे चित्र आहे. चीनची कोरोना संदर्भात चौकशी होणार असेलच, तर ती निष्पक्ष आणि राजकीय किनार नसलेली मुक्त अशी असावी, असे मत चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी म्हटले आहे. यासोबतच जग पुन्हा पूर्वीसारखे होणार नसून, चीन आपली घोडदौड सुरूच ठेवणार असल्याचे भाष्य त्यांनी केले आहे.

कोरोना काळात चीनने कसोटीस उतरून आपली राष्ट्रीय शक्ती आणि स्वतःला एक जबाबदार देश असल्याचे दर्शविले आहे. देश कितीही बलवान असला तरीही जागतिक आव्हानांपासून कोणताही देश स्वत:ला दूर करू शकत नसल्याचे, कोरोनाने दाखवून दिल्याचे त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, कोरोना मुद्यावरून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वारंवार चीनवर निशाणा साधला आहे. चीनमुळेच जगावर सध्या ही परिस्थिती ओढवल्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. तर ऑस्ट्रेलिया आणि युरोपातील अन्य राष्ट्रांनी चीनच्या चौकशीची मागणी केली आहे. त्यानंतर रविवारी पुन्हा एकदा कोरोना संदर्भात चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com