पुतीन यांच्या सहकाऱ्यांवर निर्बंध घाला; नवाल्नी यांचे आवाहन

व्लादिमीर पुतीन (डावीकडे) आणि चेल्सी क्लबचे अध्यक्ष रोमन अब्रामोविच.
व्लादिमीर पुतीन (डावीकडे) आणि चेल्सी क्लबचे अध्यक्ष रोमन अब्रामोविच.

मॉस्को - रशियातील धडाकेबाज राजकीय विरोधक ॲलेक्सी नवाल्नी यांनी अटक झाल्यानंतरही आपली मोहीम कायम ठेवली आहे. रशियाचे सर्वेसर्वा व्लादिमीर पुतीन यांच्या प्रमुख सहकाऱ्यांवर पाश्चिमात्य देशांनी निर्बंध घालावेत असे आवाहन त्यांनी केले.

नवाल्नी यांनी आठ सहकाऱ्यांची नावे जाहीर केली असून त्यात प्रिमीयर लिगमधील चेल्सी फुटबॉल क्लबचे अब्जाधीश अध्यक्ष रोमन अब्रामोविच यांचा समावेश आहे.

विमानातील संशयित विषबाधेनंतर जर्मनीत उपचार घेतलेले नवाल्नी रविवारी सायंकाळी मायदेशी परतले. त्यानंतर त्यांना लगेच अटक करण्यात आली. त्यांची सुटका करण्याचे आवाहन अमेरिका तसेच प्रमुख युरोपीय देशांनी केले आहे, पण पुतीन सरकारने त्याकडे दुर्लक्षच केले आहे.

एका महिन्याची कोठडी
सोमवारी न्यायालयाने नवाल्नी यांना ३० दिवसांची कोठडी ठोठावली. पुढील सुनावणी दोन फेब्रुवारी रोजी आहे. त्यावेळी त्यांना किमान साडेतीन वर्षांसाठी तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली जाऊ शकते. शिक्षेच्या अटींचा भंग केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

या पार्श्वभूमीवर नवाल्नी यांचे सहकारी व्लादिमीर अशुर्कोव यांनी फेसबुकच्या माध्यमातून अधिक तपशील दिला. त्यांनी म्हटले आहे की, नवाल्नी यांनी दिलेल्या यादीचा पाश्चिमात्य देशांमधील सरकारांनी आढावा घ्यावा. नवाल्नी यांची तातडीने सुटका झाली नाही तर या व्यक्तींवर निर्बंध घातल्याचे जाहीर करण्यात यावे.

अब्रामोविच यांच्याशिवाय शक्तीशाली भांडवलदार अलीशेर उस्मानोव, व्हीटीबी बँकेचे मुख्य कार्यवाह आंद्रे कॉस्तीन, आरोग्य मंत्री मिखाईल मुराश्को यांचा या यादीत समावेश आहे. याशिवाय पुतीन यांच्या सहकाऱ्यांच्या काही प्रौढ मुलांचाही यात समावेश आहे.

तणाव वाढणार
नवाल्नी यांना अटक होताच अनेक मोठ्या देशांनी रशियावर टीका केली. आता नवाल्नी यांचे आवाहन तसेच त्यांच्या समर्थकांकडून निघणारे निषेध मोर्चे बघता रशिया आणि युरोप यांच्यातील तणाव वाढण्याचीच चिन्हे आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

समर्थकांना साद - घाबरू नका
नवाल्नी यांनी सोमवारी न्यायालयात एक व्हिडिओ संदेश चित्रित केला. त्यात त्यांनी समर्थकांना साद घातली आहे. त्यांनी म्हटले आहे की, घाबरू नका. रस्त्यावर या, केवळ माझ्यासाठीच नाही तर तुमच्यासाठी आणि तुमच्या भविष्यासाठी हे करा.

२३ जानेवारीला मोर्चा
नवाल्नी यांच्या समर्थकांनी २३ जानेवारी रोजी निधेष मोर्चाचे आयोजन करण्याची तयारी सुरु केली आहे. त्याचे स्वरूप देशव्यापी असेल. स्थानिक अधिकाऱ्यांनी मनाई केली तरी त्यांचे आदेश धाब्यावर बसविण्याचा त्यांचा निर्धार आहे.

रशियाचे प्रत्युत्तर
पाश्चिमात्य देशांच्या टीकेला रशियाकडून जोरदार प्रत्यूत्तर देण्यात आले. परराष्ट्र मंत्री सर्जी लॅव्रोव यांनी सांगितले की, नवाल्नी यांच्याबाबतच्या घडामोडींचा आंतरराष्ट्रीय पातळीवर होत असलेला निषेध म्हणजे पाश्चिमात्य देशांमधील स्थानिक समस्यांपासून लक्ष अन्यत्र वळविण्याचा प्रयत्न आहे.  पाश्चिमात्य राजकारणी याकडे एक संधी म्हणून पाहात आहेत. सुधारणेसाठी अवलंब केलेल्या उदारमतवादी नितीमुळे इतिहासातील सर्वांत तीव्र संकट त्यांच्यावर ओढविले आहे. 

निवडणुकीची पार्श्वभूमी
रशियन संसदेतील ४५० जागांसाठी येत्या सप्टेंबरमध्ये सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. कोरोनाच्या जागतिक साथीमुळे मंदी निर्माण झाली असल्यामुळे पुतीन यांच्या सरकारच्या विरोधात जनमत तयार होत आहे. त्यातच पुतीन यांनी तब्बल २०३६ पर्यंत सत्तेवर राहण्याच्यादृष्टिने घटनाबदल केला आहे. त्यामुळेही त्यांच्यावर टीका होत आहे. या पार्श्वभूमीवर नवाल्नी यांचे मायदेशी परतणे आणि त्यांना अटक होणे या घडामोडींचे आगामी काळात तीव्र पडसाद उमटतील.

पुढील आठवड्यात बैठक
युरोपीय महासंघाच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक पुढील आठवड्यात होणार आहे. त्यावेळी रशियावर नवे निर्बंध लादण्याचा विचार करावा असे आवाहन लॅट्विया, लिथुएनिया आणि इस्टोनिया या देशांनी केले आहे, मात्र इतर देशांकडून यास किती पाठिंबा मिळेल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com