माझ्यावरील विषप्रयोगाचे दोषी पुतीनच : ॲलेक्सी नवाल्नी

alexei navalny
alexei navalny

बर्लिन - माझ्यावरील विषप्रयोगाबद्दल अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यावर संशय असल्याचे रशियातील राजकीय विरोधक ॲलेक्सी नवाल्नी यांनी ठामपणे सांगितले. आपण घाबरणार नाहीच आणि रशियाला परतून मोहीम सुरू करू, असेही त्यांनी निर्धारपूर्वक सांगितले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

नवाल्नी यांनी डर स्पीगेल या जर्मन मासिकाला मुलाखत दिली. ते म्हणाले की, या गुन्ह्यामागे पुतीन यांचा हात आहे. याशिवाय माझे दुसरे कोणतीही म्हणणे नाही. आता मी रशियाला परतणार आहे. निर्भय राहण्याचे माझे ध्येय आहे. मुळात मला भिती वाटत नाही. माझे हात थरथरत असतील तर ते विषप्रयोगामुळे, भितीमुळे नव्हे. मी रशियाला परत न जाण्याची भेट पुतीन यांना देऊ इच्छित नाही.

नवाल्नी सध्या पत्नीसह बर्लिनमध्ये राहात आहेत. रशियात परतल्यानंतर व्हिडिओ चॅनेलवरून नियमित व्हिडिओ पोस्ट करणे पुन्हा सुरू करू. वनवासातील विरोधी नेता बनण्याची माझी इच्छा नाही, असेही त्यांनी सांगितले.

मेर्केल यांची भेट
रुग्णालयात असताना जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मेर्केल यांनी आपली भेट घेतल्याची माहिती त्यांनी दिली. ते म्हणाले की, माझे जर्मनीशी वैयक्तिक संबंध आहेत. रशियाबद्दल मेर्केल यांना सखोल माहिती आहे आणि त्यामुळे मी प्रभावित झालो आहे. अर्थात त्यांना माझ्या सल्ल्याची गरज नाही, पण पुतीन सध्या मूर्खपणा करीत आहेत. अशावेळी रशियाबद्दलचे कोणतेही धोरण त्यांना जबाबदार धरण्याचे असले पाहिजे. जर्मनीशी पुतीन संघर्ष करणार नाहीत अशी वेळ टळून गेली आहे.

ऑगस्टमध्ये रशियातील देशांतर्गत विमानात नवाल्नी यांची प्रकृती खालावली. त्यानंतर त्यांना जर्मनीत हलविण्यात आले. अद्ययावत उपचारांमुळे ते बरे झाले. त्यांच्यावर नोव्हीचोक या अण्वस्त्रांमधील प्राणघातक रसायनाद्वारे विषप्रयोग झाल्याचा अहवाल जर्मनीतील रुग्णालयाने दिला आहे.

पाश्चिमात्य देशांनी रशियाकडून स्पष्टीकरणाची मागणी केली आहे, पण सरकारचा यात हात नसून गुन्हा घडल्याचा पुरावा मिळाला नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

घातक रसायन माझ्या शरीरात भिनले तेव्हा मला कोणत्याही वेदना होत नव्हत्या, पण मी मरणार आहे असे कळून चुकले होते. आता मात्र प्रकृतीत सातत्याने सुधारणा होत असून एका पायावर संतुलन साधण्याचा प्रयत्न करतो आहे.
- ॲलेक्नी नवाल्नी

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com