भारतीय तेल कंपन्यांचा परतावा अडकला

रशियातील गुंतवणुकीमुळे कोंडी, तब्बल आठ अब्ज रूबल थकले
crude oil
crude oilSakal

नवी दिल्ली - रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर पाश्चिमात्य देशांनी निर्बंधांचे शस्त्र उपसले असून याचा मोठा फटका काहीशी तटस्थ भूमिका घेणाऱ्या भारतालाही बसताना दिसतो आहे. येथील दोन रशियन उद्योगसमूहामध्ये गुंतवणूक करणाऱ्या भारतीय कंपन्यांचा तब्बल आठ अब्ज रूबलचा (१२५.४९ दशलक्ष डॉलर) परतावा अद्याप मिळणे बाकी आहे अशी माहिती ‘ऑइल इंडिया लिमिटेड’च्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी दिली. रशियाच्या व्हॅंकोरनेफ्ट तेल प्रकल्पामध्ये ऑइल इंडिया, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन आणि भारत पेट्रोलियम या भारतीय कंपन्यांच्या समूहाची तब्बल २३.९ टक्के एवढी गुंतवणूक असून पूर्व सायबेरियातील तास- युरयाकाह तेलप्रकल्पामध्ये २९.९ टक्के एवढी गुंतवणूक आहे. तास- युरयाकाह या प्रकल्पातून दर तिमाहीला तर व्हॅंकोरमधून साधारणपणे सहा महिन्याला परतावा मिळत होता. सध्या युरोपीय देशांनी रशियावर मोठ्या प्रमाणावर निर्बंध घातल्याने हा परतावा मिळणे मुश्कील होऊन बसले असल्याचे ‘ऑइल इंडिया’चे प्रमुख हरीश माधव यांनी नुकतेच एका पत्रकार परिषदेमध्ये बोलताना सांगितले होते.

म्हणून युरोपीय देश नाराज

रशियाने २४ फेब्रुवारी रोजी युक्रेनवर हल्ला केल्यानंतर युरोपीय देश आणि अमेरिकेकडून निर्बंध घालण्यात आले होते. भारताने रशियाच्या हल्ल्याचा थेट निषेध करणे टाळले असले तरीसुद्धा त्याचे उघड समर्थन देखील केलेले नाही त्यामुळे युरोपातील अनेक देश नाराज असल्याचे बोलले जाते. आता याच देशांनी घातलेल्या निर्बंधांचा मोठा फटका तेल व्यवहाराला देखील बसताना दिसतो. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यानंतर सरकारी मालकीच्या ‘ऑइल इंडिया’च्या मार्चच्या तिमाही नफ्यामध्येही भर पडली होती तो ९२.३२ टक्क्यांवर (१६.३० अब्ज रुपये) पोचला होता.

कंपन्यांचा माघारीचा विचार

भविष्यातील प्रतिकूल स्थिती अशाच पद्धतीने कायम राहिल्यास भारतीय तेल कंपन्या रशियन प्रकल्पांतून माघार घेऊ शकतात. केंद्रीय पातळीवर देखील याबाबत गांभीर्याने विचार सुरू असल्याचे ऑइल इंडियाचे चेअरमन एस.सी. मिश्रा यांनी सांगितले. रशियातून बीपी (ब्रिटिश पेट्रोलियम) आणि एक्सॉन मोबाइल कॉर्प या कंपन्यांनी माघार घेतल्यानंतर तेथे निर्माण झालेली पोकळी भरून काढण्याचा भारताकडून गांभीर्याने विचार सुरू आहे. ‘शेल’ कंपनी देखील रशियन प्रकल्पांतील वाटा भारताला विकण्याचा गांभीर्याने विचार करते आहे. दुसरीकडे गॅस ट्रान्समिटर क्षेत्रातील आघाडीची कंपनी ‘गेल इंडिया लिमिटेड’ रशियातील मालमत्ता विकत घेण्याच्या विचारात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com