पुतीन यांचे कट्टर विरोधक नवाल्नींना अटक; नाट्यमय पद्धतीने घेतलं ताब्यात

alexi navalny
alexi navalny

मॉस्को - रशियाचे सर्वेसर्वा व्लादिमीर पुतीन यांचे विरोधक अॅलेक्सी नवाल्नी यांना नाट्यमय घडामोडी होऊन रविवारी सायंकाळी मॉस्कोत अटक करण्यात आली. भ्रष्टाचाराविरुद्ध वेळोवेळी आवाज उठविणाऱ्या, सरकारविरोधी जनमत तयार करण्यात यशस्वी ठरलेल्या नवाल्नी यांचा कायमचा काटा काढण्याच्या हेतूने गेल्या ऑगस्टमध्ये विमानात त्यांच्यावर विषप्रयोग झाल्याची शक्यता आहे.

जर्मनीत वेळीच उपचार मिळाल्याने सावरलेल्या नवाल्नी यांनी पुतीन यांच्या विरोधात शड्डू ठोकण्याचा निर्धार व्यक्त करताच त्यांच्या अटकेची जय्यत तयारी करण्यात आली होती. अत्यंत योजनाबद्ध रीतीने ही कार्यवाही करण्यात आली. बर्लिनहुन मॉस्कोला येणारे विमान मुळ वेळापत्रकानुसार नुकोवो विमानतळावर उतरणार होते, पण ऐनवेळी मार्ग बदलून ते शेरेमेत्यीएवो विमानतळावर उतरविण्यात आले. 

नवाल्नी यांचे स्वागत करण्यासाठी नुकोवो विमानतळावर त्यांचे शेकडो समर्थक जमले होते. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. विमानतळाच्या टर्मिनलवर गर्दी केलेल्या जमावालाही पोलिसांनी पांगविले. त्यावेळी समर्थकांनी जोरदार घोषणा दिल्या. रशिया मुक्त होईल असे त्यांचे घोषवाक्य होते. त्याच्या जोडीला नवाल्नी-नवाल्नी असा जयघोष करण्यात आला. दरम्यान, नवाल्नी यांनी आपल्या युट्युब चॅनेलवर पोस्ट केलेल्या लाइव्ह व्हिडिओनुसार विमान दुसऱ्या विमानतळावर उतरताच अधिकारी त्यांच्याकडे गेले.

कशाचीही भीती नाही
बर्लिनहून येणाऱ्या विमानात नवाल्नी यांच्यासह काही पत्रकारांनीही प्रवास केला. मायदेशी परतण्याबाबत नवाल्नी यांनी त्यांच्याशी संवाद साधला. ते म्हणाले की, हे माझे घर आहे. मला कशाचीही भीती वाटत नाही. मॉस्कोत परतल्यास दीर्घकाळ तुरुंगात डांबले जाईल अशी कल्पना असूनही नवाल्नी यांनी निर्धार व्यक्त केला. त्यानंतर पोलिस घेऊन जाण्याआधी त्यांनी पत्नी युलिया हिचे चुंबन घेतले. यासंदर्भात अधिकाऱ्यांनी इतकेच सांगितले की, शिक्षेबाबत न्यायालय या महिन्यात निर्णय घेईपर्यंत नवाल्नी यांना तुरुंगात ठेवले जाईल.

वकिलांना संपर्कास मनाई
नवाल्नी यांच्या वकील ओल्गा मिखाईलोवा यांनी एको ऑफ मॉस्को या नभोवाणी केंद्राला सांगितले की, विमानतळाजवळील खिम्की पोलिस ठाण्यात नवाल्नी यांना डांबून ठेवण्यात आले होते. तेथे त्यांना भेटण्यास किंवा संपर्क साधण्यास मला मनाई करण्यात आली. पोलिसांनी मला त्या इमारतीमध्ये प्रवेशच करू दिला नाही. नवाल्नी यांच्या प्रवक्त्या किरा यार्मीश यांनी सांगितले की, इतर दोन वकिलांना पोलिसांनी इमारतीत प्रवेश दिला, पण नवाल्नी यांना भेटू दिले नाही. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com