कोरोना लस संशोधनात रशिया सगळ्यांत पुढं; लसीकरण सुरू होणार?

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 1 August 2020

रशियामधून एक भूवया उंचावणारी बातमी आली आहे. रशियाचे आरोग्य मंत्री ऑक्टोंबरमध्ये देशातील सर्व नागरिकांसाठी लसीकरण मोहीम सुरु करणार आहेत.

मॉस्को- कोरोना महामारी जगभरात थैमान घालत आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना विषाणूवर प्रभावी लस तयार करण्यासाठी वैज्ञानिक दिवसरात्र प्रयत्न करत आहेत. यातच रशियामधून एक भूवया उंचावणारी बातमी आली आहे. रशियाचे आरोग्य मंत्र्यांनी ऑक्टोंबरमध्ये देशातील सर्व नागरिकांसाठी लसीकरण मोहीम सुरु करणार असल्याची माहिती दिली आहे. कोरोना विषाणूवरील प्रभावी लस निर्माण झाली असून लसीने तिन्ही वैद्यकीय चाचण्या पूर्ण केल्याचा दावा करण्यात आला आहे. रशियातील स्थानिक माध्यमांनी शनिवारी याबाबतची माहिती दिली आहे. 

ट्विटर हॅक करुन, 17 वर्षांच्या पोरानं एका दिवसांत कमावले 1 लाख डॉलर

रशियाचे आरोग्य मंत्री मिखाईल मुरोश्को म्हणाले की, मॉस्को राज्य संशोधन संस्थेने लस निर्मितीसाठीच्या सर्व वैद्यकीय चाचण्या पूर्ण केल्या केल्या आहेत. आता या लसीची नोंद करण्यासाठी कागदपत्रे तयार केली जात आहेत. सर्वात आधी डॉक्टर आणि शिक्षकांना कोरोनोवरील लस देण्यात येईल. ऑक्टोंबरमध्ये लस देण्यासाठी आम्ही व्यापक योजना बनवत आहोत. 

ऑगस्टमध्ये रशियाची पहिली कोविड-19 लस स्थानिक नियामक संस्थेकडून मंजूरी मिळवेल आणि त्यानंतर आरोग्य कर्मचाऱ्यांना ही लस सर्वात आधी देण्यात येईल, असं सूत्रांच्या हवाल्याने रॉयटर्सने सांगितलं आहे. रशियाची गॅमेलेया संस्था अॅडेनोव्हायरस आधारित लस निर्माण करत आहे. 'हिंदूस्तान टाईम्स'ने याबाबतचे वृत्त दिलं आहे.

रशिया लस संबंधात ज्या गतीने पुढे जात आहेत त्याबाबत पाश्चात्य माध्यमे प्रश्न उपस्थित करत आहेत. मॉस्को विज्ञान आणि सुरक्षेपेक्षा राष्ट्रीय प्रतिष्ठेला जास्त प्रश्न महत्व देत आहे का, असे प्रश्न केले  जात आहेत. रशियाच्या प्रत्यक्ष गुंतवणूक निधीचे प्रमुख किरील दिमित्रिव यांनी रशियाच्या लस निर्मित्याच्या यशाची तुलना सोवियत युनियनने 1957 साली प्रक्षेपित केलेल्या स्पूतनिकशी केली आहे. स्पूतनिक हा अवकाशात सोडलेला पहिला उपग्रह होता. 

कोरोना लसीवर श्रीमंत देशांच्या उड्या; आधीच खरेदी करतायत कोट्यवधी डोस

शुक्रवारी रशियामध्ये 95 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत देशात 14,058 लोकांचा कोरोना विषाणूमुळे जीव गेला आहे. शुक्रवारी 5462 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून देशात एकूण 8,45,443 कोरोनाग्रस्त झाले आहेत. 

दरम्यान, जगभरात 140 पेक्षा अधिक उमेदवार कोरोनावर प्रभावी लस निर्माण करण्याच्या कामात गुंतले आहेत. त्यातील कमीतकमी 5 उमेदवार मानवी चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात पोहोचल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे. चीन आणि ब्रिटनमधील उमेदवारांची लस तिसऱ्या टप्प्यात पोहोचली आहे. 
(edited by- kartik pujari)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Russia completed clinical trials preparing mass vaccination against coronavirus