चांगली बातमी! रशियाच्या 'स्पुटनिक-5' कोरोना लशीबाबत मोठा दावा

सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, 27 October 2020

कोरोना महामारीचा कहर वाढत असताना, जगभरातील वैज्ञानिक कोरोनावरील प्रभावी लस निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत आहेत

मॉस्को- कोरोना महामारीचा कहर वाढत असताना, जगभरातील वैज्ञानिक कोरोनावरील प्रभावी लस निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. रशियाने कोरोनावर सर्वात आधी लस तयार केल्याचा दावा केला आहे. रशियाच्या स्पुटनिक-5 लशीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरु आहे. आतापर्यंत या चाचणीचे जे निकाल आले आहेत, त्यावरुन ही लस सुरक्षित आणि प्रभावी असल्याचे सांगण्यात येत आहे. 85 टक्के स्वयंसेवकांमध्ये कोणतेही साईड इफेक्ट दिसले नसल्याची माहिती देण्यात आली आहे. 

लालू-राबडींचे फोटो पोस्टरवरुन 'गायब'; रविशंकर प्रसाद यांचा तेजस्वींना...

द मॉस्को टाईम्सच्या रिपोर्टनुसार, ज्या स्वयंसेवकांना कोरोनाची लस देण्यात आली होती, त्यातील 85 टक्के स्वयंसेवकांमध्ये कोणतेही साईट इफेक्ट दिसले नाहीत. स्पुटनिक-5 लशीची निर्मिती करणाऱ्या कंपनीने याची माहिती दिली आहे. रशियाची स्पुटनिक-5 लस मॉस्कोची गमालिया रिसर्च इंस्टीट्यूट ऑफ एपिडिमियोलॉजी आणि मायक्रोबायोलॉजी विकसित करत आहे. ऑगस्टमध्ये लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला सुरुवात झाली होती. तिसऱ्या टप्प्यामध्ये 40,000 स्वयंसेवकांचा समावेश करण्यात आला आहे.

गमालियाचे प्रमुख अलेक्झांडर गिंट्सबर्ग यांनी सरकारी टीव्हीशी बोलताना सांगितले की, स्पुटनिक लशीचे साईड इफेक्ट सामान्य आहेत. यात साधा ताप, डोकेदुखी, अंगदुखी होई शकते. पण, असे साईड इफेक्ट केवळ 15 टक्के स्वयंसेवकांमध्ये दिसले आहेत. 85 टक्के स्वयंसेवकांमध्ये स्पुटनिक-5 लशीचे कोणतेही साईड इफेक्ट दिसले नाहीत. शिवाय त्यांनी डोस दिल्यानंतर कोणतीही तक्रार केली नाही.

पाकिस्तान: पेशावरमधील मदरशात बॉम्बस्फोट; 7 जणांचा मृत्यू, 70 जखमी

दरम्यान, रशियाने पहिल्या दोन टप्प्यातील चाचण्या घेतल्यानंतर 11 ऑगस्ट रोजी तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणीला सुरुवात केली. रशियाच्या पहिल्या दोन चाचण्यांचे परिक्षण जागतिक आरोग्य संघटनेने केले नाही. शिवाय रशियाने यासंबंधीची माहिती कोणासोबत शेअर केलेली नाही.  त्यामुळे या लशीबाबत शास्त्रज्ञांमध्ये साशंकता आहे. स्पुटनिक-5 लशीबाबत भारत आणि रशियामध्ये बोलणी झाली आहे. भारतात या लशीच्या चाचणीचे परिक्षण आणि वितरणासाठी गमालिया इंस्टीट्यूटने डॉ. रेड्डी लॅबोरेटरिजसोबत करार केला आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: russia corona sputnik vaccine big announcement