रशियाच्या लसीचं सत्य वेगळंच! फक्त 38 लोकांवर चाचणी करून मांडला बाजार

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 12 August 2020

रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी कोरोना वॅक्सिन तयार झाल्याची घोषणा केली होती. 

मॉस्को - रशियाचे (russia) राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन (Vladimir Putin) यांनी कोरोना वॅक्सिन तयार झाल्याची घोषणा केली होती. मात्र आता त्याची चाचणी फक्त 38 लोकांवर केल्याची माहिती समोर येत आहे. रशियाच्या अधिकृत कागदपत्रांच्या आधारे डेली मेलने याबाबतचे वृत्त दिलं आहे. रशियाच्या कोरोना वॅक्सिनचे दुष्परिणाम समोर आल्याचं सांगितलं जात आहे. यानुसार फक्त 38 लोकांवर कोरोनाची चाचणी करण्यासाठी मंजुरी दिल्याचं डेली मेलने म्हटलं आहे. 

Fontanka न्यूज संस्थेच्या वृत्तानुसार रशियाच्या कोरोना वॅक्सिनच्या दुष्परिणामांमध्ये वेदना, घाम येणं, ताप येणं यासारखे त्रास समोर आले आहेत. याशिवाय अशक्तपणा, ताकद नसल्यासारखं वाटणं, भूक न लागणं, डोके दुखी, डायरिया, सर्दीमुळे नाक गच्च होणं, गळ्यात त्रास होणं यासारख्या तक्रारीही आल्या आहेत. 

हे वाचा - रशियाची कोरोनावरील लस लाखो लोकांना देणं घातक; वाचा जगभरातील देशांच्या प्रतिक्रिया

रिपोर्टमध्ये असाही दावा करण्यात आला आहे की, रशियन अधिकाऱ्यांनी फक्त 42 दिवस संशोधनानंतर वॅक्सिनला मंजुरी दिली आहे. यामुळेच वॅक्सिन किती प्रभावी आहे हे समजू शकलं नाही असं म्हटलं आहे. वॅक्सिनच्या नोंदणीसाठी जी कागदपत्रे देण्यात आली होती त्यात लिहिलं होतं की, कोरोनावर वॅक्सिनचा कितपत प्रभाव आहे याबाबत कोणताही क्लिनिकल अभ्यास झालेला नाही. मात्र पुतीन यांनी म्हटलं होतं की, वॅक्सिन सर्व आवश्यक त्या चाचण्यांमध्ये पास झाली आहे. 

रशियाने त्यांच्या कोरोना वॅक्सिनचं नाव Sputnik V ठेवलं आहे. अनेक देशांमध्ये वॅक्सिनचा पुरवठा कऱण्याची तयारी सुरू आहे. जगभरातील अनेक देशांनी, संशोधकांनी रशियाच्या या कृतीवर टीका केली आहे. संशोधकांना भीती वाटते की, वॅक्सिनचा परिणाम उलट झाला तर कोरोना आणखी भयंकर रूप घेऊ शकतो. 

हे वाचा - सलग आठव्या दिवशी देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा अमेरिका, ब्राझीलपेक्षाही अधिक

पुतीन यांनी म्हटलं होतं की वॅक्सिन टोचल्यानंतर त्यांच्या मुलीला काही वेळ ताप होता.  मात्र Fontanka न्यूज एजन्सीने म्हटलं की, वॅक्सिनचे दुष्परिणाम वेगवेगळ्या प्रकारचे असतात. हा त्रास पुन्हा पुन्हा होतो आणि अनेकदा तो बराच काळ जाणवतो.

रिपोर्टनुसार, वॅक्सिनचे बहुतांश परिणाम आपोआप बरे झाले मात्र अभ्यासानंतर 42 व्या दिवशीसुद्धा दुष्परिणामाचे 31 प्रकार समोर आले. वॅक्सिनचा डोस दिलेल्या काहींच्या शरिरात 42 व्या दिवशी अँटिबॉडीजचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी होतं. 

हे वाचा - चीन सगळ्यात आधी सैनिकांना देतोय कोरोना लस

रशियाने 10 वर्षांपेक्षा कमी आणि 60 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या लोकांनाही लस टोचण्यास परवानगी दिलेली नाही. कारण अशा लोकांवर काय परिणाम होणार याची माहिती त्यांच्याकडे नाही. गर्भवती आणि मुलांना स्तनपान करणाऱ्या महिलांनादेखील वॅक्सिन दिलं जाणार नाही. गंभीर आजार असलेल्यांना यांना काळजी घेत वॅक्सिनचा डोस देण्याबाबत सांगितलं आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: russia covid vaccine trial on only 38 people reported daily mail