
रशियाचे सैन्य खारकिव्हमध्ये घुसले
किव्ह : युक्रेनमधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर असलेल्या खारकिव्हमध्ये आज पहाटे रशियाचे सैन्य घुसले. या सैन्याला युक्रेनच्या सैनिकांनी विरोध केल्याने शहरातील रस्त्यांवर चकमक सुरु झाली आहे. राजधानी किव्हभोवतीचाही वेढा रशियाने आणखी घट्ट केला आहे.
रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर युद्धाच्या आजच्या चौथ्या दिवशी रशियाच्या सैनिकांनी खारकिव्हमध्ये प्रवेश केला. त्यांच्या सैन्याला युक्रेनचे सैनिक आणि नागरिकांकडूनही प्रतिकार होत आहे. रशियाच्या विमानांनी हवाई हल्ल्यांचा जोर वाढविला असून युक्रेनमधील हवाई तळ आणि इंधन पुरवठा केंद्रांना प्रामुख्याने लक्ष्य केले जात आहे. त्यांच्या या आक्रमणाविरोधात पाश्चिमात्य देशांनी युक्रेनला बळ देताना मोठ्या प्रमाणावर शस्त्र पुरविताना रशियावरील निर्बंधांमध्येही वाढ केली आहे. रशियाने युक्रेनवर आक्रमण करताच त्यांचे सैन्य खारकिव्हपासून २० किमी अंतरापर्यंत येऊन पोहोचले होते. मात्र, त्यांनी शहरात प्रवेश न करता देशाच्या इतर भागात हल्ल्याचा वेग वाढविला होता. आज मात्र पहाटे त्यांनी शहरात प्रवेश केला. येथील प्रशासनाने नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, शहराच्या सीमेवर युक्रेनच्या सैनिकांबरोबरच नागरिकही शत्रू सैन्याला विरोध करताना दिसत होते.
हेही वाचा: Russia Ukraine War: सलमानची गर्लफ्रेंड युलिया पुतीनवर चिडली, 'तुम्ही आता...'
युक्रेनवर हल्ला करण्यामागील अंतिम उद्देश रशियाचे अध्यक्ष व्लादीमिर पुतीन यांनी जाहीर केला नसला तरी युक्रेन सरकार उलथवून टाकत त्या देशाला आपल्या ताब्यात घेण्याचा त्यांचा इरादा असल्याचा विश्लेषकांचा अंदाज
आहे.
गॅस पाइपलाइन उडविली
आज पहाटेच तळघरांमध्ये लपून बसलेल्या किव्हमधील नागरिकांना प्रचंड मोठ्या स्फोटांच्या आवाजाने जाग आली. शहराच्या दक्षिणेला असलेल्या एका तेलाच्या साठा केंद्रावर बाँब पडल्याने हा स्फोट झाला होता. त्यामुळे पहाटेच आकाशात आगीचे लोळ दिसत होते. येथील झुलियानी विमानतळावर आणखी एक मोठा स्फोट झाला. खारकिव्हमध्ये घुसलेल्या रशियाच्या सैन्याने गॅस पाइपलाइन बाँब टाकून उडवून दिली. त्यामुळे नागरिकांनी घराच्या खिडक्या बंद करून स्वत:चे संरक्षण करावे, असे आवाहन युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.
युक्रेनलाशस्त्रास्त्रांची मदत
रशियाविरोधात तग धरून राहण्याची युक्रेनची क्षमता वाढविण्यासाठी अमेरिकेने युक्रेनला ३५ कोटी डॉलरची लष्करी मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. याद्वारे युक्रेनला रणगाडाविरोधी अस्त्रे, चिलखती वाहने आणि छोटी शस्त्रे पुरविली जाणार आहेत. जर्मनीनेही युक्रेनला ५०० क्षेपणास्त्रे आणि एक हजार रणगाडाविरोधी अस्त्रे पुरविण्याचा निर्णय घेतला आहे.
Web Title: Russian Troops Invade Kharkiv
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..