खुशखबर : रशियन लस स्फुटनिक-व्ही ठरली 92 % टक्के परिणामकारक

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 11 November 2020

भारतातही या लशीच्या चाचण्या सुरु झाल्या आहेत. डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजने या लशीच्या चाचणीची जबाबदारी घेतली आहे.

मॉस्को : सध्या जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. भारतातदेखील कोरोनाने हाहाकार माजवला आहे. सर्वसामान्य माणसाला आता फक्त लस कधी येईल याचीच आशा आहे. जगभरात ठिकठिकाणी लसनिर्मितीसाठी प्रयत्न सुरु आहेत. जगात सगळ्यात आधी ज्यांनी लसनिर्मितीचा दावा केला होता त्या रशियाच्या लशीला आता मोठं यश मिळाल्याचं निष्कर्षात समोर आलं आहे. रशियाची स्फुटनिक- व्ही ही लस कोरोनापासून वाचण्यासाठी 92 टक्के परिणामकारक असल्याचं रशियाने सांगितलं आहे. रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड या संस्थेने या लशीच्या ट्रायलचे अंतिम निकाल हातात आल्याचं कळवलं आहे. सध्या ही लस बाजारात आहे. 

हेही वाचा  - US Election : पराभव न स्वीकारणं हे राष्ट्राध्यक्षांच्या परंपरेला लाजिरवाणं; बायडन यांचा टोला
रशियाने स्फुटनिक-व्ही या लशीची 16000 लोकांवर चाचणी घेतली होती. या चाचणीमध्ये या लोकांना दोन दोन डोस देण्यात आले होते. या लशीला सर्वांत आधी म्हणजे 11 ऑगस्टला मंजुरी देण्यात आली होती. त्यानंतर लसनिर्मितीचा दावा करणारा रशिया हा जगातील पहिला देश बनला होता. रशियाची ही लस एडीनेव्हायरस व्हेक्टरवर आधारित असल्याचं सांगण्यात आलंय. तसेच ही लस रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या मुलीलाही देण्यात आली होती. ही लस मॉस्कोमधील गमालिया इन्स्टिट्यूट ऑफ एपिडेमिओलॉजी एँड मायक्रोबायोलॉजीने तयार केली आहे. याबाबतचं वृत्त रशियन वृत्तसंस्था TASS ने दिलं होतं. रशियामध्ये ही लस मोफत दिली जाणार आहे. मात्र, इतर देशांसाठी या लशीची किंमत किती असेल, हे अद्याप अस्पष्ट आहे. 

हेही वाचा - Corona Update: अमेरिकेने सर्व विक्रम मोडले, 24 तासांत आढळले तब्बल 2 लाखांहून अधिक रुग्ण

रशियाने ही लस आणल्यावर या लशीबाबत साशंकता व्यक्त करण्यात आली होती. घाईगडबडीत चाचण्यांविना आधीच लशीला मंजूरी देण्याचा निर्णय घातक असल्याचा निर्वाळा तज्ज्ञांनी दिला होता. भारतातही या लशीच्या चाचण्या सुरु झाल्या आहेत. डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजने या लशीच्या चाचणीची जबाबदारी घेतली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Russias Sputnik V vaccine is 92 percent effective at protecting people from COVID19