'स्पुटनिक 5' लशीसाठी भारताशी भागिदारी करू; रशियन अधिकाऱ्यांची माहिती

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 20 August 2020

कोरोनावर जगातील पहिली लस तयार केल्याचा दावा करणाऱ्या रशियाची लस भारतात तयार होऊ शकते. त्यासाठी रशिया तयार असल्याची माहिती त्यांच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. 

मॉस्को - कोरोनावर जगातील पहिली लस तयार केल्याचा दावा करणाऱ्या रशियाने आता तिच्या सामूहिक चाचण्यांसाठी (मास टेस्टिंग) वेगाने पाऊले टाकायला सुरवात केली आहे. यासाठी आवश्‍यक असणाऱ्या देशांतर्गत नियामक यंत्रणेची देखील रशियन सरकार लवकरच मान्यता मिळवण्याच्या तयारीत आहे. पुढील आठवड्यामध्ये रशिया ४० हजार लोकांचे लसीकरण करणार असून आंतरराष्ट्रीय शोधसंस्थांच्या देखरेखीखाली ही प्रक्रिया पार पडणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान या लशीची माहिती रशियाकडून आंतरराष्ट्रीय संस्थांना माहिती दिली जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. 

दरम्यान, ‘स्पुटनिक-५’ लशीसाठी भारताशी भागीदारी करण्याचा विचार करत असल्याचे रशियाच्या थेट गुंतवणूक निधीचे प्रमुख किरील दिमित्रीएव यांनी सांगितले. ते म्हणाले की, रशियाने विकसीत केलेल्या लशीचे उत्पादन करण्यासाठी अनेक देश उत्सुक आहेत. मात्र, आमच्या गरजेनुसार ही लस उत्पादित करण्याची क्षमता भारताकडे असल्याने त्यांच्याशी भागीदारी करण्याचा आमचा विचार आहे. तसेच, या लशीची चाचणी केवळ रशियातच नाही तर, संयुक्त अरब अमिराती, ब्राझील, सौदी अरेबिया आणि भारतातही घेण्याचा आमचा विचार असल्याचे त्यांनी सांगितले.  

हे वाचा - रशियात पुतीन यांचा कट्टर विरोधक रुग्णालयात दाखल; विषप्रयोग झाल्याचा संशय

रशियाने कोरोनावरील या लसीला स्पुटनिक-५ असे नाव आहे. या लशीच्या पहिल्या टप्प्यातील काही छोट्या समुहांवरील चाचण्या यशस्वी झाल्या असून आता तिच्या अधिक व्यापक प्रमाणावर चाचण्या घेण्यात येतील. सध्या जगभरातील बऱ्याचशा देशांकडून लशीसाठी मागणी नोंदविण्यात आली असून आमची क्षमता ही दरवर्षी पाचशे दशलक्ष लशीच्या निर्मितीची आहे असे रशियन अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. दरम्यान रशियन लसीचे निष्कर्ष पुढील महिन्यामध्ये सार्वजनिक केले जाणार आहेत. 

हे वाचा - लडाख मुद्यावर भारत-चीन यांच्यात बैठक; LAC वरून सैन्य मागे घेण्यावर सहमती

रशिया मोठ्या प्रमाणावर घेणार चाचणी
कोरोना लशीवरून रशियाकडे संशयानं पाहिलं जात आहे. त्यामुळेच रशिया त्यांच्या लशीची पुढच्या आठवड्यापासून मोठ्या प्रमाणावर चाचणी घेणार आहे. यामध्ये तब्बल 40 हजार लोकांचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय शोध संस्थेच्या देखरेखीत  ही चाचणी होणार आहे. जगातील अनेक देशांनी रशियाच्या कोरोना लशीच्या माहितीबाबत शंका उपस्थित केली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sputnic 5 covid vaccine russia ready for partnership with india