श्रीलंकेत महिंदा राजपक्षे चौथ्यांदा पंतप्रधान; घराण्याची सत्ता कायम 

srilanka
srilanka

कोलंबो, ता.९ : श्रीलंकेचे माजी अध्यक्ष महिंदा राजपक्षे यांनी देशाचे १३ वे पंतप्रधान म्हणून आज शपथ घेतली. उत्तर कोलंबोतील उपनगर असलेल्या केलानियामधील ‘राजमहा विहारय’ या प्राचीन बौध्द मंदिरात शपथविधीचा सोहळा संपन्न झाला. यावेळी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष, आतषबाजी केली. ७४ वर्षीय राजपक्षे यांना त्यांचे बंधू आणि देशाचे अध्यक्ष गोटबया राजपक्षे यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.

राजपक्षे यांच्या श्रीलंका पीपल्स पार्टी (एसएलपीपी) या पक्षाने नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत दणदणीत विजय मिळविला. ‘एसएलपीपी’ने दोन तृतीयांश बहुमत मिळविले. त्यामुळे घटनेत सुधारणा करून राजपक्षे घराण्याची सत्ता कायम ठेवण्याचा मार्गही मोकळा झाला. महिंदा राजपक्षे यांची श्रीलंकेचे पंतप्रधानपद भूषविण्याची ही चौथी वेळ आहे. 

सरकारमधील मंत्र्यांचा शपथविधी या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. भारताचे श्रीलंकेतील उच्चायुक्त गोपाल बागले यांनीही राजपक्षे यांना दूरध्वनीवरून शुभेच्छा दिले. नूतन पंतप्रधानांना शुभेच्छा देणारे ते पहिलेच राजदूत ठरले. यावेळी बागले यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीलंकेत यशस्वीरित्या निवडणूका पार पाडल्याबद्दल श्रीलंकेचे सरकार, नागरिक, आणि ‘एसएलपीपी’चे अभिनंदन केल्याची आठवणही करून दिली. मोदी यांनीपक्षाला शुभेच्छा दिल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले. 

राजपक्षेंच्या राजकीय कारकीर्दीचा सुवर्ण महोत्सव 
श्रीलंकेचे नूतन पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी जुलैमध्ये नुकतीच आपल्या राजकीय कारकीर्दीची ५० वर्षे पूर्ण केली. ते १९७० मध्ये वयाच्या अवघ्या २४ व्या वर्षी खासदार म्हणून निवडून गेले. आत्तापर्यंत त्यांनी श्रीलंकेचे अध्यक्षपद दोनदा भूषविले असून तीन वेळा देशाचे पंतप्रधानही राहिले आहेत. 

राजपक्षे यांची कारकीर्द 

  • एप्रिल २००४ ते नोव्हेंबर २००५ 
  • २०१८ (५२ दिवसांसाठी) 
  • नोव्हेंबर २०१९ ते ५ ऑगस्ट २०२० 

वैशिष्ट्यपूर्ण राजमहा विहारय 
श्रीलंकेची राजधानी कोलंबोच्या उत्तरेकडील हे मंदिर केलानिया मंदिर म्हणूनही ओळखले जाते. मंदिराच्या संकेतस्थळानसार सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वीचे हे प्राचीन मंदिर श्रीलंकेतील अनेक सत्ताधीशांच्या उदय आणि अस्ताचे साक्षीदार आहे. देशातील राजकीय सत्तांशी मंदिराचा घनिष्ठ संबंध असल्याचे मानले जाते. मंदिराच्या उदयाबरोबर राजकीय सत्तांचाही उदय होतो, अशीही एक म्हण प्रचलित आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com