Earth_Summer
Earth_Summer

बातमी महत्त्वाची : उन्हाळा होणार ६ महिन्याचा; वैज्ञानिकांचा गंभीर इशारा

बीजिंग (पीटीआय) : पर्यावरण बदलाचा वेग कमी करण्यासाठी प्रयत्न सुरु असले तरी चालू शतक संपेपर्यंत वातावरणात बदल होऊन उत्तर गोलार्धात उन्हाळ्याचा कालावधी सहा महिने होईल, असा अंदाज संशोधकांनी व्यक्त केला आहे. या बदलाचा शेती, मानवी आरोग्य आणि एकूणच पर्यावरणावर खोलवर परिणाम होऊ शकतो, असा इशाराही देण्यात आला आहे.

चीनमधील विज्ञान अकादमीने याबाबत संशोधन केले असून त्याबाबतचा अहवाल ‘जिओफिजिकल रिसर्च लेटर्स’ या नियतकालिकात प्रसिद्ध झाला आहे. संशोधन करताना १९५२ ते २०११ पर्यंतच्या नोंदींचा अभ्यास करत उत्तर गोलार्धातील चार हंगामांच्या सुरु होण्याची आणि त्याच्या एकूण कालावधीमध्ये झालेल्या बदलांची नोंद घेण्यात आली. हंगाम कसे बदलत गेले, याचा अभ्यास करण्यासाठी संशोधकांनी वेगवेगळी प्रारुपे तयार केली आणि त्याआधारे भविष्यात कसा बदल होईल, याचा अंदाज बांधण्यात आला.

१९५२ पासून २०११ या कालावधीत उत्तर गोलार्धातील उन्हाळ्याचा कालावधी ७८ दिवसांवरून ९५ दिवसांपर्यंत वाढला, तर हिवाळ्याचा कालावधी ७६ दिवसांवरून ७३ दिवसांपर्यंत कमी झाला. वसंत ऋतूचा कालावधीही १२४ दिवसांवरून ११५ दिवस, तर शरद ऋतूचा कालावधी ८७ दिवसांवरून ८२ दिवसांपर्यंत कमी झाल्याची नोंद घेण्यात आली. वसंत आणि उन्हाळा अपेक्षेपेक्षा लवकर सुरु झाले, तर शरद आणि हिवाळा हे ऋतू अपेक्षेपेक्षा उशिराने सुरु झाले, असेही निरीक्षणास आले. बदलाचा हा वेग कायम राहिल्यास उत्तर गोलार्धात या शतकाच्या अखेरीस हिवाळा दोन महिन्यांपेक्षा कमी काळ असेल, तर उन्हाळा सहा महिने असेल, असे अहवालात नमूद करण्यात आले.

ऋतूचक्र बदलते आहे...
या अहवालानुसार, भूमध्य क्षेत्र आणि तिबेटच्या पठारावर मोठ्या वेगाने ऋतूचक्र बदलत आहे. पन्नासच्या दशकात उत्तर गोलार्धात चार हंगाम अपेक्षित वेळी आणि प्रमाणात अनुभवास आले होते. आता मात्र वातावरणात मोठे बदल होत असल्याने हंगाम सुरु होण्याचा कालावधी बदलत आहे. भविष्यात हे बदल अधिक तीव्र होऊ शकतात, असे संशोधकांचे म्हणणे आहे. बदलत्या परिस्थितीत, उन्हाळ्याचा कालावधी वाढत असून तो अधिक उष्ण ठरत आहे. तसेच, हिवाळ्याचा कालावधीही कमी होऊन पूर्वीपेक्षा त्याची तीव्रता कमी झाली आहे, असे या अभ्यास गटातील सदस्य युपिंग गुआन यांनी सांगितले.

आरोग्यावर परिणाम
वातावरण बदलाचा मोठा परिणाम पर्यावरण आणि मानवी आरोग्यावर होण्याचा अंदाज संशोधकांनी वर्तविला आहे. याशिवाय, पक्षीही स्थलांतराची पद्धत बदल असून अनेक वनस्पती उगविण्याचा कालावधीही बदलला आहे. यामुळे या वनस्पतींवर अवलंबून असलेले प्राण्यांच्या जीवनावरही परिणाम होत असून स्थलांतर करणाऱ्या पक्षांमध्येही गोंधळ उडत असल्याचे अहवालात म्हटले आहे. यामुळे पर्यावरणला धोका निर्माण झाला आहे. याशिवाय, बदलाचा शेतीवरही विपरित परिणाम शक् आहे.

- जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com