अफगाण सैनिकांवर हल्ले सुरू ठेवणार; तालिबानची घोषणा

पीटीआय
मंगळवार, 3 मार्च 2020

तालिबानबरोबर करार धक्कादायक नाही - जयशंकर
नवी दिल्ली - अमेरिकेने तालिबानबरोबर केलेला करार अजिबात धक्कादायक नसून त्यांच्यात तडजोड होणार, हे जवळपास सर्वांनाच माहीत होते, असे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी आज सांगितले. या शांतता करारानंतर अफगाणिस्तानात कसे बदल घडतील, याचे भारत निरीक्षण करेल, असेही ते म्हणाले. जयशंकर म्हणाले, ‘‘दोहामध्ये झालेला करार आश्‍चर्यचकित करणारा नव्हता. हे म्हणजे ट्रेलर पाहिल्यानंतर ‘पाकिजा’ पाहण्यासारखे होते. अफगाणिस्तानात गेल्या वीस वर्षांत फार मोठे बदल झाले आहेत. या सकारात्मक बदलांचा प्रभाव नष्ट होऊ न देणे महत्त्वाचे आहे. अमेरिकेला आमचे हेच सांगणे आहे.'

काबूल - अफगाणिस्तानात शांतता निर्माण होण्यासाठी अमेरिका-तालिबान दरम्यान झालेल्या कराराची शाईदेखील अद्याप वाळली नसताना या कराराच्या अंमलबजावणीवर शंका निर्माण होत आहेत. अमेरिकेने कबूल केले असले तरी तालिबानचे पाच हजार दहशतवादी सोडणार नाही, असे अफगाणिस्तान सरकारने काल (ता. १) जाहीर केल्यानंतर आज तालिबाननेही अफगाणिस्तानच्या सैनिकांवर हल्ले सुरू करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. 

सूर्यमालेबाहेरील 'या' ग्रहावर असू शकते जीवसृष्टी... 

अमेरिका-तालिबानमध्ये झालेल्या करारात अमेरिकेने सैन्य माघारी घेणे, तालिबानने अमेरिकेच्या सैनिकांवर हल्ले न करणे आणि तालिबानने शांततेसाठी अफगाणिस्तान सरकारबरोबर चर्चा करणे, असे प्रमुख मुद्दे आहेत. शांततेसाठी तालिबान आणि अफगाणिस्तान सरकार यांच्यात होणारी चर्चा सफल होणे अत्यावश्‍यक असताना मुळात ही चर्चा सुरु होण्याआधीच दोघे एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. करारापूर्वी तालिबानने शांतता सप्ताह पाळला होता. हा शांततेचा काळ संपवून आम्ही लवकरच अफगाणिस्तानच्या सैनिकांवर हल्ले सुरू करणार आहोत, असे तालिबानने आज जाहीर केले आहे.

आणखी वाचा - कोरोना दिल्लीत धडकला, भारतात आणखी दोन रुग्ण आढळले

करारात, विदेशी सैनिकांवर हल्ले करायचे नाही, अशी अट आहे, याकडेही तालिबानने लक्ष वेधले आहे. हा करार म्हणजे आपण अमेरिकेवर मिळविलेला विजय असल्याचा प्रचार तालिबानने अफगाणिस्तानभर सुरु केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Taliban announces to launch attacks on Afghan troops