esakal | दररोज तीस हजार रुग्णांची भर; ब्रिटनमध्ये ‘अनलॉक’ची तयारी
sakal

बोलून बातमी शोधा

britain)

दररोज तीस हजार रुग्णांची भर; ब्रिटनमध्ये ‘अनलॉक’ची तयारी

sakal_logo
By
टीम ई सकाळ

लंडन : ब्रिटन येत्या १९ जुलैपासून अनलॉक होत असताना आगामी काळ पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्यासाठी कसोटीचा असणार आहे. दररोज ३० हजाराच्या आसपास कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत असताना रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची आणि मृतांची संख्या मात्र कमीच आहे. ऑगस्ट २०२० पासून ते मार्च २०२१ पर्यंत एक हजार रुग्णामागे ८१ रुग्ण दवाखान्यात दाखल झाले तर १८ जणांचा मृत्यू झाला आहे. एप्रिलनंतर भरती होण्याची संख्या ४५ वर येऊन पोचली आहे. आरोग्य यंत्रणेने मात्र अनलॉकवरुन धोक्याचा इशारा दिला आहे. कोरोनाच्या सावटाखाली येत्या सोमवारपासून ब्रिटन अनलॉक होत आहे. आरोग्य विभागाने १२ जुलैपर्यंतचे आकडे दिले आहेत. गेल्या आठवडाभरात दोन लाखांहून अधिक रुग्ण सापडले तर १६८ जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये एका आठवड्यात २४०० जणांचा मृत्यू झाला होता. तेव्हा ब्रिटनमध्ये लसीकरण मोहीम सुरू नव्हती. ब्रिटनमध्ये आतापर्यंत ६६ टक्के युवकांना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले तर किमान २१ टक्के युवकांनी एक डोस घेतला आहे.

हेही वाचा: SSC Result 2021: मोठी बातमी, दहावीचा निकाल उद्या

जगाला ११ अब्ज डोसची गरज

संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस ऍन्टोनिओ गुंटरेस यांनी जगातील ७० टक्के लोकांचे लसीकरण करण्यासाठी ११ अब्ज (११०० कोटी) डोसची गरज असल्याचे म्हटले आहे. त्यांनी जगभरात लसीकरणासाठी देण्यात येणाऱ्या निधीबद्दल आणि डोसबद्दल आभार मानले आहे. परंतु ही मदत पुरेशी नसल्याचेही त्यांनी नमूद केले. जगातील प्रत्येक भागातील नागरिकांना लस मिळणे गरजेचे आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी चाचणी आणि उपचार करण्यावर भर देण्याची गरज असल्याचे नमूद केले. कोव्हॅक्स कार्यक्रमातंर्गत गरीब देशांना लस दिली जात असताना जे पैसे खर्च करून लस घेऊ शकत नाहीत, अशा नागरिकांपर्यंत देखील लस पोचवणे आवश्‍यक आहे, असेही म्हणाले. सध्याच्या संसर्गाच्या स्थितीवरून त्यांनी चिंता व्यक्त केली. आगामी काळात हा संसर्ग आणखी घातक होवू शकतो. त्यामुळे जगातील मोठ्या लोकसंख्येचे अधिकाधिक लसीकरण करणे महत्त्वाचे आहे, असे गुंटरेस म्हणाले.

हेही वाचा: एक दिवस येता, पंधरा दिवस फोटो फिरवता; रोहित पवारांवर टीका

बाजार, नाइट क्लबमुळे रुग्ण वाढले

नेदरलँडमध्ये चालू आठवड्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ५०० पटीने वाढली आहे. सरकारने संपूर्णपणे निर्बंध उठवल्याने संसर्गाचा प्रसार होत आहे. काल सुमारे ८ हजार रुग्ण नव्याने आढळून आले. एका आठवड्यात ५१ हजार ८६६ रुग्ण सापडले. सध्या ७१ हजार ९५६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

रुग्णवाढीत ब्राझील आघाडीवर

ब्राझीलमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. गेल्या २४ तासात ब्राझीलमध्ये ५७,७३६ नवीन रुग्ण आढळून आले. आतापर्यंत १ कोटी ९२ लाखांपेक्षा अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. काल चोवीस तासात दीड हजारांहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला. देशात मृतांची संख्या ५३७,३९४ वर पोचली आहे. तसेच १ कोटी ७८ लाख नागरिकांनी कोरोनावर मात केली.

ब्रिटिश मेडिकल असोसिएशनचा इशारा

येत्या १९ जुलैपासून ब्रिटनमध्ये निर्बंध शिथिल होत असताना ब्रिटिश मेडिकल असोसिएशनने मात्र या अनलॉकवरुन तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अनलॉकचा निर्णय बेजबाबदारपणा आणि जोखमीचा असल्याचे म्हटले आहे. तो भविष्यात धोकादायक ठरु शकतो, असे म्हटले आहे. बीएमएचे अध्यक्ष डॉ. चांद नागपॉल यांनी म्हटले की, अगदी स्पष्टपणे धोका असताना हा बेजबाबदारपणाचा निर्णय आहे. सरकार अशा वातावरणात १९ जुलैचा निर्णय अंमलात आणू इच्छित आहे.

loading image