कोरोनानंतर ट्रम्प आले विनामास्क समोर; सार्वजनिक कार्यक्रमात म्हणाले, मला बरं वाटतंय

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 11 October 2020

व्हाईट हाऊसच्या बाल्कनीमध्ये उभे राहून बोलताना ट्रम्प यांनी म्हटलं की, मला खूप चांगलं वाटत आहे.

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आज मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या आपल्या समर्थकांच्या समोर मास्क न लावताच आले होते. कोविड आजारापासून बरे झाल्यानंतर ते पहिल्यांदाच यापद्धतीने सार्वजनिकरित्या लोकांसमोर आले होते. व्हाईट हाऊसच्या बाल्कनीमध्ये उभे राहून बोलताना ट्रम्प यांनी म्हटलं की, मला खूप चांगलं वाटत आहे. माझी इच्छा आहे की आपल्या सगळ्यांना हे माहित व्हावं की आपला देश या भयानक चीनी व्हायरसला हरवणार आहे. ट्रम्प यांनी शेकडो लोकांच्या गर्दीला संबोधित केले ज्यांनी मास्क लावला होता. परंतु, या कार्यक्रमात खुप कमी प्रमाणात सोशल डिस्टंन्सिंगचे  पालन केल्याचे दिसून आले. ट्रम्प यांनी म्हटलं की कोरोना गायब होत आहे. 

याआधी ट्रम्प यांनी म्हटलं होतं की ते आता कोणतेही औषध घेणार नाहीयत. शुक्रवारी लाईव्ह पद्धतीने झालेल्या एका टिव्ही इंटर्व्ह्यूमध्ये ट्रम्प यांनी आपल्या कोरोनाशी केलेल्या लढाईबाबतची माहिती दिली. ट्रम्प कोरोनाग्रस्त झाल्यावर त्यांना उपचारांसाठी मिलेट्री हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं होतं. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प फॉक्स वृत्तवाहिनीच्या टकर कार्लसन टूनाईट या कार्यक्रमात आले होते. हा कार्यक्रम फॉक्सच्या डॉ. मार्क सिगल यांच्यासोबत आयोजित केला गेला होता. ट्रम्प यांनी सिगल यांना सांगितलं की मी आता औषधोपचारांपासून मुक्त आहे. मी आता कोणतेही औषध घेत नाहीये. 

हेही वाचा - एकानेही मास्क न घातलेल्या हजारोंच्या सभेत किम यांची कोरोनासंबंधी मोठी घोषणा

ट्रम्प यांनी हेही सांगितलं की त्यांची दुसऱ्यांदाही कोरोना चाचणी केली गेली. त्यांनी म्हटलं की, माझी पुन्हा एकदा टेस्ट केली गेली. मला हे माहित नाही की कितीवेळा माझी टेस्ट केली गेली, मात्र माझी  पुन्हा एकदा टेस्ट केली गेलीय. त्यांनी म्हटलं की त्यांना माहीत नाहीये की त्यांची पुढची टेस्ट केंव्हा होईल. अमेरिकेच्या राष्ट्रपतींनी म्हटलं की व्हायरसमुळे त्यांची ताकद हळूहळू कमी होत गेली. परंतु, मी खूप ताकदहीन झालो नव्हतो. त्यांनी हेही सांगितलं की त्यांना श्वासोच्छवास करताना कसलाही त्रास झाला नाही. 

हेही वाचा - श्रीकांत दातार ‘हार्वर्ड’चे नवे डीन
 
ट्रम्प यांनी म्हटलं की त्यांना माहित नाही की ते व्हायरसच्या संपर्कात कुठे आले. अमेरिकेच्या प्रेसिडेंसियल डिबेटच्या आयोगाने म्हटलंय की राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी व्हर्च्यूअल डिबेटमध्ये सहभागी होण्यास नकार दिल्यानंतर त्यांचे प्रतिस्पर्धी जो बायडेन यांच्यासोबतची होणारी डिबेट ही रद्द करण्यात आली आहे. आयोगाने एका वक्तव्यात हे जाहीर केलंय की 15 ऑक्टोबर रोजी कोणतीही डिबेट होणार नाही. तिसरी आणि अंतिम डिबेट 22 ऑक्टोबर रोजी नॅशविले, टेनेसीमध्ये होईल. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: trump said i feel great after recovering corona