'फ्रेंच लोकांना मारण्याचा मुस्लिमांना अधिकार', ट्विटरने मलेशियाच्या माजी पंतप्रधानांचे ट्विट हटवले

सकाळ वृत्तसेवा
Friday, 30 October 2020

मलेशियाचे माजी पंतप्रधान महातिर मोहम्मद यांच्या एका ट्विटमुळे जगभरातून त्यांच्यावर टीका केली जात होती. महातिर मोहम्मद यांचे ट्विट हिंसेचं समर्थन करणारं होतं असं कारण देत ते ट्विटरने हटवलं आहे. 

पॅरिस - मलेशियाचे माजी पंतप्रधान महातिर मोहम्मद यांच्या एका ट्विटमुळे जगभरातून त्यांच्यावर टीका केली जात होती. महातिर मोहम्मद यांचे ट्विट हिंसेचं समर्थन करणारं होतं असं कारण देत ते ट्विटरने हटवलं आहे. फ्रान्समध्ये झालेल्या चाकु हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मोहम्मद यांनी फ्रेंच लोकांना मारण्याचा अधिकार मुस्लिमांना आहे असं खळबळजनक ट्विट केलं होतं. यानंतर सोशल मीडियावरून प्रचंड संताप व्यक्त केला जात होता.

फ्रान्सचे डिजिटल सेक्टरमधील मंत्र्यांनी त्यांच्या ट्विटवर टीका केली आणि मलेशियाचे माजी पंतप्रधानांचे ट्विटर अकाउंट सस्पेंड करण्याची मागणी केली होती. त्यांनी असंही म्हटलं की, ट्विटरने जर ट्विट हटवलं नाही तर त्यांनाही हत्येमध्ये सहभागी असल्याचं मानलं जाईल. 

ट्विटरने सुरुवातील महातिर मोहम्मद यांच्या ट्विटला डिस्क्लेमर दाखवला. या ट्विटमधून ट्विटरच्या नियमांचे उल्लंघन झालं असल्याचं म्हटलं होतं. मात्र काही काळाने ट्विट डिलिट केलं मात्र ट्विटचा थ्रेड तसाच ठेवण्यात आला आहे.

हे वाचा - पाकच्या संसदेत मोदी-मोदी घोष झाला नव्हता; खरा VIDEO आला समोर

पैगंबर मोहम्मद यांच्याबद्दलचे एक कार्टून क्लासमध्ये दाखवल्यानं एका शालेय शिक्षकाची 10 वर्षीय विद्यार्थ्याने हत्या केली होती. यानंतर फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी कट्टरपंथी मुस्लिमांवर टीका केली होती. यावर महातिर मोहम्मद यांनी एका पाठोपाठ 13 ट्विट केली होती. त्यात शिक्षकाच्या हत्येसाठी मुसलमान आणि मुस्लिम धर्माला आरोपी ठरवल्याबद्दल मॅक्रॉन यांना असभ्य आणि मागासलेले असल्याचं म्हटलं होतं. 

 फ्रान्समधील नीस शहरातील चर्चमध्ये गुरुवारी एका हल्लेखोराने चाकू हल्ला करत तिघांना ठार केले. या क्रूर घटनेमध्ये एका महिलेसह तिघांचा मृत्यू झाला आहे. तसेच आणखी काही फ्रान्स नागरिक जखमी झाले आहेत. हल्लेखोराला पोलिसांनी ताब्यात घेतले असून नीस शहराचे महापौर क्रिश्चियन एस्ट्रोसी यांनी दहशतवादी हल्ला असं या हल्ल्याचं वर्णन केलं आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: twitter remove Malaysia former pm twit about France attack