म्यानमारच्या लोकांचे भारतात स्थलांतर, परिस्थिती बिघडेल; संयुक्त राष्ट्रांचा इशारा

myanmar.
myanmar.

जीनिव्हा- म्यानमारमध्ये लष्करी बंडानंतर नागरिकांची सुरक्षा अत्यंत धोक्यात आली असून त्यामुळे अनेक नागरिक थायलंड आणि भारताच्या सीमा ओलांडत बेकायदा स्थलांतर करत असल्याचे संयुक्त राष्ट्रांच्या सरचिटणीसांच्या म्यानमारबाबतच्या विशेष दूत ख्रिस्टीन बर्गनर यांनी निदर्शनास आणून दिले असून, स्थलांतराची ही केवळ सुरुवात असू शकते असा इशाराही दिला आहे. या परिस्थितीवर लवकरात लवकर उपाय शोधणे आवश्‍यक आहे अन्यथा परिस्थिती आणखी बिघडू शकते, असेही त्यांनी सांगितले आहे. म्यानमारमधील परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या १५ सदस्यांची बंद दाराआड चर्चा झाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, म्यानमारमधील परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी जागतिक समुदायाने ठोस प्रयत्न करणे आवश्‍यक असून आशियातील देशांनी आपला प्रभाव वापरून म्यानमारमध्ये स्थैर्य आणणे आवश्‍यक असल्याचे बर्गनर यांनी सदस्यांना सांगितले. या देशातील परिस्थिती दिवसेंदिवस खालावत असून भारत आणि थायलंडच्या सीमेवर नागरिकांचे लोंढे धडकत आहेत. ही केवळ स्थलांतराची सुरुवात असू शकते, असा इशाराही त्यांनी दिला.

भारताकडून निषेध व्यक्त

सुरक्षा परिषदेत बोलताना म्यानमारमधील हिंसाचाराचा भारताने निषेध केला. देशातील हिंसाचार थांबावा आणि राजकीय नेत्यांची सुटका करावी, अशी मागणी भारताने केली आहे. म्यानमारमधील परिस्थितीवर शांततापूर्ण मार्गाने तोडगा काढला जावा, असे सांगतानाच भारताचे संयुक्त राष्ट्रांमधील कायमस्वरुपी प्रतिनिधी टी. एस. तिरुमूर्ती यांनी म्यानमारमधील राखीन प्रांताच्या विकासासाठी हातभार लावण्याचीही तयारी दर्शविली.

सशस्त्र बंडखोरांना साद

म्यानमारमधील पदच्युत सरकारमधील खासदारांनी देशाची २००८ मधील राज्यघटना चुकीची असल्याचे जाहीर करत लष्करासमोर नवे राजकीय आव्हान उभे केले आहे. सर्वच सत्ता लष्कराच्या ताब्यात असल्याने आंदोलकांच्या या घोषणेला फारसा अर्थ नसला तरी त्यामुळे आदिवासी सशस्त्र गटांना आपल्या बाजूने ओढण्यात यश येण्याची आंदोलकांना आशा आहे. या खासदारांनी भूमिगत समांतर सरकार स्थापन केले आहे. दरम्यान, म्यानमार सरकारने एकतर्फी शस्त्रसंधी जाहीर केली. मात्र, कारभारात ढवळाढवळ करणाऱ्यांसाठी ही शस्त्रसंधी लागू नसेल, असेही त्यांनी स्पष्ट करण्यात आले आहे.

लष्करी बंडाला दोन महिने पूर्ण

म्यानमारमध्ये लोकशाही मार्गाने आलेल्या सरकारच्या हातून लष्कराने सत्ता हिसकावून घेण्याच्या घटनेला आज दोन वर्षे पूर्ण झाली. एक फेब्रुवारीला लष्कराने हे बंड केल्यानंतर त्याच दिवसापासून नागरिकांनी त्याविरोधात आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलकांवर लष्कराने गोळीबार सुरु करूनही आंदोलनाचा जोर कायम आहे.

आंदोलनातील ठळक घडामोडी

- यांगून, मंडाले, न्यापीताव या प्रमुख शहरांसह सर्व ठिकाणी नागरिकांकडून शांततापूर्ण निदर्शने
- आँग सान स्यू की यांच्यासह सर्व प्रमुख नेत्यांना अटक
- लष्कर आणि पोलिसांकडून आंदोलकांवर दडपशाहीचा वापर
- अश्रुधूर, पाण्याचा फवारा, लाठीमार, अटकसत्र यानंतर गोळीबारही
- पोलिसांच्या गोळीबारात आतापर्यंत ५२० हून अधिक जण ठार
- २७ मार्चला एकाच दिवशी १०७ जणांना गोळ्या घातल्या

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com