US Election - जमिनीवर झोपून दिवस काढले आता बदल घडवेन; मराठमोळ्या ठाणेदारांचा निर्धार

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 5 November 2020

 अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या (US Election) लढतीत डेमोक्रेटिक पक्षाचे जो बायडेन (Joe Biden) हे आघाडीवर असून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (President Donald Trump) पिछाडीवर आहेत. 

वॉशिंग्टन - अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या (US Election) लढतीत डेमोक्रेटिक पक्षाचे जो बायडेन (Joe Biden) हे आघाडीवर असून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (President Donald Trump) पिछाडीवर आहेत. या निवडणूकीत अनेक भारतीय वंशाच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे. यामध्ये मराठमोळ्या श्री ठाणेदार (Shri Thanedar) यांचाही समावेश आहे. त्यांनी मिशिगनमध्ये (MIchiegan) प्रतिस्पर्धी उमेदवाराला धूळ चारत 93 टक्के मते मिळवली आहेत. 

भारतीय वंशाचे श्री ठाणेदार हे मिशिगन राज्यातून आमदार झाले आहेत. त्यांनी एकूण मतांपैकी 93 टक्के मते मिळवली. त्यांच्याविरोधात सहा उमेदवार होते. त्यांना पराभूत करून ठाणेदारांनी दणदणीत विजय मिळवला. 

ठाणेदार यांचा जन्म कर्नाटकातील बेळगाव येथे गरीब कुटुंबात झाला होता. लहानपणी कुटुंबाला आधार देण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या नोकऱ्या केल्या होत्या. त्यांनी मुंबई विद्यापीठातून वयाच्या १८ व्या वर्षी रसायनशास्त्रातील पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले होते. यानंतर ते १९७९ मध्ये अमेरिकेला स्थलांतरीत झाले. १९८८ पासून ते अमेरिकेचे नागरिक आहेत.

हे वाचा - US Election 2020: पराभव झाला तर डोनाल्ड ट्रम्प अमेरिका सोडणार का ?

ठाणेदार यांनी २०१८ मध्ये प्रायमरीची निवडणूक लढविली होती. मात्र, यात त्यांचा पराभव झाला होता. त्यावेळी त्यांनी दूरचित्रवाणीवर ‘श्री फॉर वुई’ ही जाहीरात प्रचंड प्रमाणात केल्याने त्यांचे नाव चर्चेत आले होते. मात्र, त्यावेळी एक कोटी डॉलर खर्च करूनही त्यांना विजय मिळाला नव्हता. यानंतर ते डेट्रॉइट येथे स्थायिक झाले आणि येथे त्यांनी विजय मिळविला.

गेल्या अनेक वर्षांत काहीही बदल झालेला नाही. हा बदल मी घडवेन. अनेक लोक वंचित आहेत. मीदेखील जमिनीवर झोपून दिवस काढले आहेत. गरीबीचे दु:ख मी जाणतो.
- श्री ठाणेदार

कोरोनाचं संकट जगावर ओढावलं असून याचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला. या काळात त्यांनी मिशिगनमध्ये सॅनिटायझर, मास्क यांचे वाटप केले. जनतेला या संकटकाळात आधार देण्याचं काम त्यांनी केलं. आता निवडणून आल्यानंतर राज्यातील गुन्हेगारी, बेरोजगारी, गरिबी कमी करण्याचा प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

हे वाचा - US election: यंदाची निवडणूक सर्वार्थाने वेगळी; पहिल्यांदाच घडल्यात काही गोष्टी

डेमोक्रेटिक पक्षाचे प्रतिनिधी असलेले भारतीय वंशाचे चार खासदार पुन्हा निवडून आले आहेत. यामध्ये अॅमी बेरा, प्रमिला जयपाल, रो खन्ना आणि राजा कृष्णमृर्ती यांचा समावेश आहे. अमेरिकेत भारतीयांचा प्रभाव वाढत असल्याचंच यातून दिसत आहे.

अमेरिकेत जवळपास 18 लाख भारतीय मतदार आहेत. ते अमेरिकेतील फ्लोरिडा, जॉर्जिया, मिशिगन, उत्तर कॅरोलिना, पेनसिल्वानिया आणि टेक्सासमध्ये सर्वाधिक आहेत. या चार खासदारांपैकी अॅमी बेरा या सलग पाचव्यांदा तर रो खन्ना आणि प्रमिला जयपाल तिसऱ्यांदा विजयी झाले आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: US election 2020 indian origin shri thanedar won with 93 percent votes