US Election 2020 : अमेरिकेत सत्तांतर;बायडेन व्हाइट हाऊसचे नवे कारभारी 

पीटीआय
Sunday, 8 November 2020

अखेरच्या टप्प्यात पेन्सिल्व्हानियाने हात दिल्यानंतर बायडेन यांना बहुमतासाठीचा २७० इलेक्टोरल मतांचा टप्पा ओलांडता आला. अमेरिकेचे ४६ वे अध्यक्ष म्हणून बायडेन हे शपथ घेतील.

न्यूयॉर्क- जगाची महासत्ता असणाऱ्या अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीमध्ये अखेरीस डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडेन यांचीच सरशी झाली. अखेरच्या टप्प्यात पेन्सिल्व्हानियाने हात दिल्यानंतर बायडेन यांना बहुमतासाठीचा २७० इलेक्टोरल मतांचा टप्पा ओलांडता आला. अमेरिकेचे ४६ वे अध्यक्ष म्हणून बायडेन हे शपथ घेतील. कमला हॅरिस यांना अमेरिकेच्या पहिल्या महिला कृष्णवर्णीय उपाध्यक्ष होण्याचा बहुमान मिळाला आहे. 

बायडेन यांच्या विजयानंतर डेमोक्रॅटिक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यांवर उतरून एकच जल्लोष करायला सुरूवात केली आहे. पेनसिल्व्हानियाची इलेक्टोरल मते ही २० एवढी असल्याने बायडेन यांनी येथे बाजी मारताच त्यांचा विजय अधिक सुकर झाला. विशेष म्हणजे विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मात्र हा विजय आम्हाला मान्य नसल्याचे म्हटले आहे. आम्ही याविरोधात न्यायालयामध्ये खटला भरू, असेही ट्रम्प यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे. या निकालानंतर बायडेन यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘‘ मी सर्व अमेरिकींचा अध्यक्ष म्हणून काम करेल. आपल्या महान देशाचे नेतृत्व करण्याचा सन्मान तुम्ही मला दिला आहे. आपल्या समोरचे काम हे कठीण आहे. तुम्ही मला मतदान केले असेल अथवा नसेल, मी तुम्ही दाखविलेल्या विश्‍वासाला जागेन.’’ या निकालानंतर अमेरिकेच्या गुप्तचर संस्थांनी बायडेन यांच्या भोवतीचे सुरक्षा कवच अधिक भक्कम करायला सुरूवात केली आहे. विशेष म्हणजे बायडेन विजयी झाल्यानंतर देखील पेनसिल्व्हानिया, अॅरिझोना, नेवाडा आणि जॉर्जिया या राज्यांतील मतमोजणी सुरू होती. 

हे वाचा - US Election : थेट अंतराळातून दिलं मत; जाणून घ्या कशी होते ही प्रक्रिया

सर्वांत वयोवृद्ध अध्यक्ष 
बायडेन हे अमेरिकेचे सर्वांत वयोवृद्ध अध्यक्ष असतील. सध्या त्यांचे वय ७७ वर्षे एवढे आहे. याआधी बराक ओबामा हे अमेरिकेचे अध्यक्ष असताना बायडेन हे उपाध्यक्ष होते. डेलावेरचे सिनेटर पद देखील त्यांनी प्रदीर्घ काळ भूषविले होते. 

हॅरिस यांचे महत्त्व 
आता उपाध्यक्षपदी विराजमान होणाऱ्या कमला हॅरिस (वय ५६) या भारतीय वंशाच्या असून त्या आता अमेरिकेच्या पहिल्या महिला उपाध्यक्ष तसेच भारतीय वंशाच्या, पहिल्या कृष्णवर्णीय आणि आफ्रिकी अमेरिकी उपाध्यक्ष असतील. बायडेन आणि हॅरिस यांचा शपथविधी २० जानेवारी रोजी पार पडेल 

हे वाचा - बायडन-ट्रम्प लढाईत अमेरिकेनं रचला इतिहास; मोडला 120 वर्षांपूर्वीचा विक्रम

ट्रम्प गोल्फ खेळत होते 
आज बड्या माध्यम समूहांनी बायडेन यांच्या विजयाची घोषणा केली असताना ट्रम्प हे व्हर्जिनियामध्ये गोल्फ खेळत होते. याआधी १९९२ साली जॉर्ज बुश हे अध्यक्ष झाल्यानंतर त्यांच्यानंतर लागोपाठ या पदावर येणाऱ्या नेत्यांना सलग दुसऱ्यांदा अध्यक्षपद भूषविण्याची संधी मिळाली होती पण ट्रम्प यांना मात्र दुसऱ्या फेरीमध्ये सपशेल मार खावा लागला. 

'We Did It Joe', बायडेन यांना कमला हॅरिस यांचा कॉल; शेअर केला VIDEO​

अमेरिकीजनांनी, या महान देशाचे नेतृत्व करण्याची संधी देऊन माझा गौरवच केला आहे. आपल्या पुढचे काम कठीण आहे पण मी तुम्ही सर्वांना वचन देतो की मी सर्व अमेरिकींचा अध्यक्ष होईल. तुम्ही मला मतदान केलेले असेल किंवा नसेल मी तुम्हाला दिलेला शब्द पाळेल. 
- ज्यो बायडेन, अध्यक्षपदाचे उमेदवार  

US Election 2020 : ज्यो बायडेन बनले अमेरिकेचे ४६ वे अध्यक्ष; ट्रम्प यांच्यावर केली मात


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: US Election 2020 Joe Biden wins presidential election