Video:अमेरिकेतील प्रचारसभेतही आला पाऊस; कमला हॅरिस यांनी गाजवली सभा

सकाळ न्यूज नेटवर्क
Friday, 23 October 2020

डेमोक्रॅटिक पक्षाच्या उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवार कमला हॅरिस या एका प्रचार सभेत छत्री घेऊन डान्स करताना दिसल्या

वॉशिंग्टन- अमेरिकेत 3 नोव्हेंबर रोजी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका पार पडणार आहेत. या पार्श्वभूमीवर डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिकन पक्षाचे नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. अशात डेमोक्रॅटिक पक्षाच्या उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवार कमला हॅरिस या एका प्रचार सभेत छत्री घेऊन नाचताना दिसल्या. त्यामुळे त्यांचा हटके अंदाज पाहायला मिळाला. 

कमला हॅरिस फ्लोरिडातील मतदारांना संबोधित करत असताना पाऊस सुरु झाला. यावेळी हॅरिस यांनी आपलं संबोधन सुरुच ठेवलं, शिवाय त्यांनी डान्सही केला. त्यांच्या या डान्सचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिली असून हॅरिस यांच्या डान्सचे कौतुक केले जात आहे. या घटनेचा व्हिडिओ मीना हॅरिस यांनी ट्विट केला आहे.

55 वर्षीय हॅरिस यांनी फ्लोरिडातील जॅक्सनविले येथे प्रचारसभा घेतली. यावेळी अचानक पावसाला सुरुवात झाली पण हॅरिस यांनी आपलं भाषण थांबवलं नाही. त्यांनी छत्रीची मदत घेत आपल्या मतदारांशी बोलणं सुरुच ठेवलं. तसेच त्यांनी डान्स करुन मतदारांची मनंही जिंकली. पाऊस, ऊन आणि लोकशाही कशाचीही वाट पाहात नाहीत, असं त्या यावेळी म्हणाल्या. पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही भर पावसात साताऱ्यात सभा घेतली होती. त्यांची ही सभा चांगलीच गाजली आणि त्याचा अनुकूल परिणाम निवडणूक निकालावरही पडल्याचे सांगितले जाते. त्यामुळे अशाच प्रकारचं अमेरिकेत पाहायला मिळतंय का हे पाहावं लागेल. 

US Election: 'ट्रम्प vs बायडेन'  कोण ठरलं वरचढ? वाचा डिबेटमधील...

कमला हॅरिस या उपराष्ट्रपतीपदासाठी मैदानात आहेत. हॅरिस यांची आई भारतीय तर वडील जमेकन होते. डेमोक्रॅटिक पक्षाचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार ज्यो बायडेन यांनी त्यांना रनिंग मेंट म्हणून निवडलं आहे. हॅरिस या उपराष्ट्रपतीपदासाठी उभे राहणाऱ्या पहिल्या कृष्णवर्णीय आणि आशियाई-अमेरिकी महिला आहेत. त्यांनी यापूर्वी सिनेटर या पदावर असताना प्रभावी काम केले आहे.

दरम्यान, अमेरिकेतील राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी काही दिवस उरले आहेत. 3 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे ज्यो बायडेन यांच्यामध्ये लढत होणार आहे. निवडणुकीपूर्वी करण्यात आलेल्या अनेक जनमत चाचण्यांमध्ये बायडेन यांना लोकांची पसंती मिळताना दिसत आहे. दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची लोकप्रियता कमी झाली आहे. असे असले तरी अध्यक्षपदावर कोण विराजमान होतं याकडे सर्व जगाचं लक्ष लागलं आहे. 

(edited by- kartik pujari)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: us election kamla harris dance in rain during rally