भारतीयांना दिलासा देत ट्रम्प यांना न्यायालयाचा दणका

सकाळ वृत्तसेवा
Friday, 2 October 2020

अमेरिकेतील निवडणुकांच्या प्रचाराला आता वेग आला असून प्रसिंडेशियल डिबेट्सनाही सुरवात झालीय. मात्र, आता या दरम्यानच अमेरिकेतील न्यायालयाने एक मोठा निर्णय दिला आहे.

वॉशिंग्टन - अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक अवघ्या एका महिन्यावर येऊन ठेपली आहे. अमेरिकेतील निवडणुकांच्या प्रचाराला आता वेग आला असून प्रसिंडेशियल डिबेट्सनाही सुरवात झालीय. मात्र, आता या दरम्यानच अमेरिकेतील न्यायालयाने एक मोठा निर्णय दिला आहे. अमेरिकेतील एका कोर्टाने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या एच-1 बी व्हिसावर आणलेल्या बंदीच्या निर्णयाला थांबवलं आहे. अमेरिकेत जाऊन काम करु इच्छिणाऱ्या भारतीय इंजिनिअर्ससाठी हा आश्वासक निर्णय आहे. 

डोनाल्ड ट्रम्प यांनी या वर्षी जून महिन्यात हा निर्णय घेतला होता. कोर्टाने म्हटलंय की, ट्रम्प यांनी हा निर्णय आपल्या संवैधानिक अधिकारांना ओलांडून घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, डोनाल्ड ट्रम्प यांच्या एच-1 बी विझा बंदीच्या निर्णयाला थांबवण्याचा निर्णय कॅलिफोर्नियातील जज जेफरी व्हाइट यांनी घेतला आहे. 

हे वाचा - डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोना; मेलानिया यांचीही टेस्ट पॉझिटिव्ह

काय आहे एच-१ विसा
एच-१ विझा हा कायमचे वास्तव्य करण्यासाठी परदेशातून येणाऱ्या लोकांसाठी असतो. अमेरिकन कंपन्याना आपल्या कंपन्यांतील विशेष पदांसाठी परदेशातील कर्मचाऱ्यांना नियुक्त करण्याची सोय या विझामुळे होते. टेक्नोलॉजी क्षेत्रातील कंपन्या दररोज भारत आणि चीनसारख्या देशातून हजारो कामगारांना आपल्या कंपन्यांमध्ये नियुक्त करतात. जूनमध्ये ट्रम्प यांनी नविन एच-१ बी विझावर अस्थायी पद्धतीने बंदी आणली होती. ट्रम्प यांनी म्हटलं होतं की अमेरिकेच्या लोकांच्या भल्यासाठी मी हा निर्णय घेतो आहे. जेणेकरुन अमेरिकन नागरिकांना नोकऱ्या मिळतील. 

हे वाचा - माझ्यावरील विषप्रयोगाचे दोषी पुतीनच : ॲलेक्सी नवाल्नी

कोलंबियातील जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश अमित पी मेहता यांनी दिलेल्या आदेशात म्हटलं होतं की, सीमा बंद झाल्यानं भारतीय नागरिक अडकून पडले आहेत. ट्रम्प यांनी घातलेल्या बंदीला न्यायालयात आव्हान दिलं होतं. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: us judge blocks h 1b visa-ban by donald trumps